जेथे गवतालाही भाले फुटत होते...
महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी खासदार भारतकुमार राऊत यांचा लेख..
X
औरंगजेबसारख्या पाताळयंत्री मोगल पातशहाविरूद्ध सतत संघर्ष करून मराठेशाही अबाधित ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई यांची आज पुण्यतिथी. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.
घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे सात वर्षे औरंगजेबाला मराठय़ांशी झुंज देत दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच मरण पत्करावे लागले.
सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी ताराराणींनी आर्थिकदृष्ट्या बळकट केली. एकीकडे मराठेशाही अधिक बळकट करत असताना त्यांच्याच काळात सत्तेचे राजकारण करताना मराठेशाहीत दुफळी निर्माण होत असल्याचेही ताराबाईंनी पाहिले.
याच काळात मराठेशाहीच्या सातारा व कोल्हापूरात दोन गाद्या तयार झाल्या व ताराबाईंना सातारा सोडून कोल्हापुरला आश्रय घ्यावा लागला. ताराबाईंचे कर्त्तृत्व अफाट होते, हे खरेच. 'गवतालाही भाले फुटतात' असे शौर्य ज्यांनी गाजवले, त्या महाराणी ताराबाईंना मानाचा मुजरा !
- भारतकुमार राऊत