अखेर कोरोनाने घात केलाच
X
अखेर कोरोनाने घात केलाच. आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विश्वस्त हरी बढे यांचे काल चंद्रपूर येथे निधन झाले. त्यांना कॅन्सर, आटोक्यात न येणारा डायबिटीस, कोविड आणि कुष्ठरोग होता.
हरीकाका नेहमीच विश्वासाचा. अतिशय मृदू आणि समजून घेणारा स्वभाव. सोमनाथ प्रकल्पाला त्याने खरी दिशा दिली. हरी काकाचे घर श्रम संस्कार छावणीत आमचा अड्डा असायचा. त्याच्या घरात दहा लोक तर आरामात गाद्या टाकून झोपत. बाहेरच्या आंब्याखाली खाटा टाकून पोरं पोरी गप्पा मारत. त्यातून अगणित लग्ने जुळली. हरी काकाचे कशालाच objection नसायचे.
त्याला कमालीचा डायबिटीस होता शुगर 400 च्या वरच असायची. त्यामुळे दिवसातून तीन चार वेळा इन्सुलिन लागत असे. मला जेव्हा गरोदरपणात डायबिटीस झाला तेव्हा कळले की इन्सुलिन घेऊन काम करणे किती कठीण असते. सारखा एक डोळा शुगर लेव्हलवर ठेवावा लागतो. जास्त डोस झाल्यास कोमात जाऊ शकतो. आजही कोरोनाच्या काळात मी पुन्हा वर्षभरापासून इन्सुलिनवर आहे. दोन वेळा शुगर 45 वर गेली होती. 5 मिनिटात कोमात गेले असते.
प्रत्येक सुई टोचताना हरी काका आठवतो की त्याने कसे केले असे सर्व त्या काळात! सोमनाथला काहीच नसतानापासून तो तिथे होता. सोमनाथचा 1300 एकरचा कॅम्पस त्याने सांभाळला. हे सर्व कसे केले असेल?
असंख्य आठवणी आहेत. सर्वच श्रम संस्कार छावणी शिबिरार्थी व्यथित असतील. आज श्रद्धांजली सभेत मला खूपच रडू आले.गेले 23 दिवस त्याला बेड मिळावा म्हणून सतत प्रयत्न सुरू होते. सेवाग्रामवरून त्याला नागपूरला शिफ्ट केले ते diabetic ketoacidosis च्या उपचारांसाठी. तिथे तो पॉझिटिव्ह आढळला. खूप खूप शोधून बेड मिळेना. मी कमीत कमी 150 लोकांना फोन आणि मेसेज केले असतील.
शेवटी एका मोठ्या राजकीय व्यक्तीकडून एका मोठ्या हॉस्पिटलला विनवणी केली. त्यांनी बेड द्यायचे कबूल केले पण शेवटपर्यंत दिलाच नाही. शेवटी त्याला अर्जंट ऑक्सीजन लावून चंद्रपूरला हलवावे लागले. तिथे खूप प्रयत्नाने एक ICU बेड मिळाला. मृत्यूच्या आदल्या दिवशीपर्यंत तब्येत उत्तम होती. अचानक spo2 70 वर गेले आणि मग घसरत गेले. काही तासांतच मृत्यू झाला.
आमची खूप इच्छा होती आनंदवनात अंत्यसंस्कार करण्याची पण नियमाप्रमाणे जावे लागले. त्यादिवशी 14 मृतदेहांना एकत्र अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे अस्थी मिळण्याचा प्रश्नच नव्हता असे शेवटी कळले.
त्याची बायकोही कोरोनामुळे उपचार घेत आहे. तिथले बरेच डॉक्टर्स स्वतः पॉझिटिव्ह असल्याने कुणाशी बोलावे कळत नाही. एकंदर हालत भयानक आहे. असे आमच्याकडे 1800 वृद्ध लोक आहेत. कडक काळजी घेऊनही कोरोनाचा शिरकाव झालाच आहे. 12 लोक पॉझिटिव्ह झाले, त्यात एक मृत्यू.
ही दुसरी लाट खूप भयानक असणार आहे म्हणतात. पुढे काय वाढून ठेवले आहे देव जाणे. आरोग्यव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे. लोक बेफिकीर आहेत. भारत कधीही आता एक नंबर वर जाईल.
डोके बंद पडले आहे. शरीर सुन्न आहे. हरी काका सोनं होता. ही पोकळी कधीच भरून येणार नाहीये. हरी काकाशिवाय सोमनाथची कल्पनाही करू शकत नाही.
गेले 11 महिने आम्ही असंख्य अडचणींना तोंड दिले आहे. कधी सोशल मीडियावर लिहिले नाही पण बेड न मिळाल्याने आपला माणूस जाणे आणि त्याला 14 प्रेतांसोबत अंत्यसंस्कार करावे लागणे हे अतिशय दुःखदायक आहे. एका क्षणात माणसाला बॉडी म्हणून संबोधले जाते. त्याच्या आयुष्यभराची पुंजी बॉडी शब्दात नष्ट होते.
मी सरकारला दोष देणे शक्य नाही कारण त्यांना अखंड सुट्टी न घेता काम करताना मी पाहिले आहे. प्रॉब्लेम आहे तो पिढ्यानपिढ्या सर्वच पक्षांच्या राज्यकर्त्यांनी आरोग्य व्यवस्थेबद्दल दाखविलेल्या अनास्थेचा. 3% बजेट अतिशय अपूर्ण आहे. याबद्दल कुठेतरी गंभीरपणे विचार झाला पाहिजे. सरकारी डॉक्टरांची हजारो पदे रिक्त आहेत. ती का भरली जात नाहीयेत कळायला मार्ग नाही. कोविड योद्धा म्हणून जॉईन केलेल्या कित्येकांना सरकार कंत्राटी बेसिस वर घेऊ शकते. त्यांना साधा TA DA पण नाही. सरकारी कर्मचारी थकव्याने इतके वेडे झाले आहेत की एकजण म्हणाले की मॅडम, आम्हाला असे वाटते की आपल्याला कोरोना झाला तर बरेच कारण त्यानिमित्ताने 14 दिवस घरी थांबता येईल. हे सर्व मी जवळून बघितले आहे. त्यांना काम करण्याची इच्छा आहे पण सुविधांचा प्रचंड अभाव आहे.
अजून एखादा नवीन रोग आला तर आपण जेवढे मेलोय त्यावर अजून मरून जाऊ. आपणही बॉडी बनून 15-15 बॉड्यांमध्ये एक म्हणून जळून जाऊ. हेच नको वाटते, बाकी काही नाही.