"शोभतं का हे या वयाला..." हे वाक्य वयस्कर लोकांचं खच्चीकरण करतं का?
आपण अनेकदा ऐकत आलोय की शरीर म्हातारं होतं पण मन म्हातारं होत नाही. अगदी हो वाक्य खरं ठरवणारे आणि तसंच मनमुराद आयुष्य जगणारे धनंजय देशपांडे यांना त्यांच्या फेसबूक वॉलवर एक लेख पोस्ट केला. त्यात त्यांना व्हॉट्सऍप वर आलेला लेख ही त्यांनी ऍड केला आहे. ज्यात 'शोभतं का हे या वयात ? या प्रसिध्द वाक्यावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नेमकं काय म्हटलं आहे त्यांच्या लेखात हे जाणून घेण्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख...
X
शोभत कां?
'शोभत का हे या वयाला ? ' हे वाक्यच मुळात चुकीचं आहे.
फार फारतर 'झेपेल का हे या वयाला ?' हे एकवेळ चालेल....
पण वयाचा आणि शोभण्याचा काय संबंध आहे बुवा !
4-5 वर्षाची मुलं जेव्हा यु - ट्युब व्हिडिओवर घडाघडा जगाचे नकाशे वाचताना दिसतात किंवा त्या
सारेगमप सारख्या कार्यक्रमात 7-8 वर्षाच्या चिमुरड्या मुली दिग्गजांनाही लाजवेल इतक्या सहजतेने शास्त्रीय संगीताच्या ताना घेतात,
तेव्हा विचारतो का हो आपण हा प्रश्न
'शोभत का हे या वयाला ? '
..तेव्हा कौतुक करतो.
पण साधारण वयाची पन्नाशी ओलांडली कि मग मात्र त्या व्यक्तीकडे बघण्याची आपली दृष्टी अशी का बदलते ?
एकदा एका परिचितांच्या घरी पार्टीला गेलो होतो. बराच मोठा गोतावळा होता. डि.जे. लावून तरूण मंडळी नाचत होती. इतक्यात माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका साठीच्या आसपासच्या सद्गृहस्थांनी गळ्यातला टाय काढला, कोट काढून बायकोच्या हातात दिला आणि ती काही बोलायच्या आत ते सरळ त्या गर्दीत घुसले. पुढचा अर्धा पाऊण तास पार 'शम्मी कपूर' ते जमिनीवर गडाबडा लोळून ' नागिन डान्स ' इथपर्यंत यथेच्छ नाचून झालं.
मी कुतूहलाने आजूबाजूच्या चेहेऱ्यांवरचे भाव बघत होते.
सगळ्यात अवघडलेला चेहेरा होता तो त्यांच्या बायकोचा ...
माझ्या नजरेला नजर भिडताच ती कसनुसं हसली. बाकी नव्वद टक्के मंडळी ' फुकट मनोरंजन होतय, होऊ दे ' या अविर्भावात होती.
मला कौतुक वाटलं ते त्या डान्स फ्लोअरवरच्या तरूण मंडळींचं. त्यांनी इतक्या पट्कन त्या गृहस्थांना ' आपलं ' म्हटलं, नाच संपल्यावर तर एका - दोघांनी त्यांना ' काका, मस्तच' म्हणून मिठ्या पण मारल्या.
ते गृहस्थ परत येऊन कोट घालत होते तेव्हा मी स्वतःहून जाऊन त्यांच अभिनंदन केलं..
ते मोकळेपणाने हसत म्हणाले ,''खूप वर्षांपासूनची इच्छा होती हो, मानेवरची नको ती जोखडं फेकून द्यायची.. आज सुरवात केलीय , अजून बरच बाकी आहे''.
पण शेवटी ते वाक्य आलंच ... बायको चिडून बोलली ,
''शोभत का हे या वयाला... स्वतःचा नाही पण आमचा तरी विचार करत जा !"
...मी अंतर्मुख झाले..
हि कसली बंधन घालून घेतली आहेत आपण..
आयुष्य छोटं आहे आणि ते वेगाने पूढे सरकतय..
मग ते जगायचचं विसरतोय का आपण?
हे खरं आहे की चिरतरूण कोणीच नाही, पण अस म्हणतात की माणसाचं वय हे मानण्यावर असतं. शारिरीक मर्यादा हळूहळू येणार, त्याला पर्याय नाही पण मनाला काही वय नसतं हो.. त्याने तरूणच रहायला काय हरकत आहे ! आणि खरं सांगू का, ही अशी साठीतली तरूणाई आजूबाजूला बघितली नं की खूप बर वाटतं. ही मंडळी तोकडे कपडे घालतात, दोरीच्या उड्याही मारतात आणि कवळ्या संभाळत एकमेकांचे मुकेही घेतात....
शोभतं की त्यांना सगळं, कारण तरूणच आहेत नं ते !
माझे मित्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी एकदा मला म्हणाले होते, '' आयुष्यात येणार प्रत्येक नवं वर्षं म्हणजे वाढ असते....अनुभवात , समजुतदारपणात, उत्साहात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आयुष्याच्या मोहकतेत..''
या मोहकतेला वयाच्या आकड्याच्या रिंगणात नको अडकवूया,
तिला तिचा सुगंध पसरवायचं स्वातंत्र्य देऊया....
आयुष्य सुंदर आहे, ते मनासारखं जगूया.. आणि जगू देऊया .. खरं नं !
(वरील लेख व्हॉट्स ऍप वरून साभार आहे )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डीडी क्लास : तुमच्यापैकी अनेकांनी मला पाहिले आहे. काहींनी सोबत पिकनिक करून तर "जवळून" अनुभवलं आहे. त्यांना माहित आहे, की मी अगदी अस्साच जगतो. लोक काय म्हणतील याचा विचारच करत नाही. वाटलं तर वाटेतच गाडी थांबवून पाणीपुरी खाऊन घेतो. वाटलं तर मधेच कामातून हळूच कल्टी मारून गाण्याचा कार्यक्रम एन्जॉय करून येतो. वाटलं तर सारसबागेत जाऊन हिरवळीवर निवांत पडून राहतो. एखाद्या गडकिल्ल्यावर गेस्ट म्हणून गेलो असेल तर उगीच प्रोटोकॉल पाळत बसत नाही. सरळ गवतावर आडवं होऊन आभाळ निरखत बसतो. फाईव्ह स्टार मधील पार्टी जेवण मधेच सोडून झेड ब्रिजखाली असलेल्या कोंगाडी लोकांमध्ये जमिनीवर बसून चटणी भाकरी खातो.
जगणं असं असावं. हे नक्की. लोक काय देवालाहि नावे ठेवतात तर आपण कोण ? आणि अमुक एका वयात अमुक असं असं वागलं पाहिजे, हे ठरवलं कुणी ? काय संबंध त्यांचा की मी कसे जगावे ? मन मारत असं जगताना उद्या चालून मीच आजारी पडलो अन सलाईन लावायची वेळ आली तर माझ्यावर कितीही प्रेम असलेली व्यक्ती माझ्या ऐवजी स्वतःला सलाईन लावून घेईल का ? नाही न ? (आणि समजा घेतलं जरी, तरी त्याचा लाभ मला होणारे का ? नाही)
मग मन मारून का जगावं ? खुरडत खुरडत ?
यावर जर कुणी म्हटलं "शोभत का वयात"
तर त्या वाक्याला हवेत उडवून लावून आपल्याला ज्यात आनंद ते करतो ! यात सगळं आलं ! समाजमान्यता हि कालसापेक्ष असते. कधीकाळी "संस्कृत" भाषेला हात का लावला, शोभत का तुम्हाला ? असं आपल्याच समाजातील लोकांनी ज्ञानेश्वरांना पण म्हटलं होत की !
त्यामुळे कालसापेक्ष ज्या व्याख्या बदलतात त्यावर फार लक्ष न देता आपण आपलं मस्त जगावं !
काय म्हणता मंडळी ? बरोबर का ?
@ dd(धनंजय देशपांडे)