करोना नावाची जागतिक विश्रांती.. आणि जगण्याची बदलती गणितं
X
आपण ऐका खूप विचित्र परिस्थिती मध्ये आहोत, खूप काळजी घ्यावी लागेल, पैसे आणि खर्च कमालीचे कमी करावे लागतील, काही लांबचे काही जवळचे जगण्याचे पर्याय शोधावे लागतील.Pandemic हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात इतका कधीच या पूर्वी इतक्या प्रकर्षाने खोलवर रुतला नव्हता ,तितका हा या वेळचा करोना असणार आहे.
अर्थव्यवस्था, सरकार आणि राजकारण यांच्या कैक योजने पुढच्या संकटांचा हा काळ असणार आहे. सातत्याने येणाऱ्या काळात देश, प्रदेश हे लॉक डाउन करावे लागणार आहेत, हे आजचं जे काही सुरू आहे,ते पुन्हा पुन्हा आपल्या मानगुटीवर बसणार आहे.
ज्यांचं जगणं तळहाताच्या वर रोजच्या रोज अवलंबून असणार आहे त्यांची अवस्था आणखी बिकट होणार आहे. आपल्या सगळ्यांना प्रचंड खबरदारी आणि धीराने या सगळ्याकडे बघण्याची गरज आहे. जगण्याचे नवे पर्याय आणि नव्या व्यवस्था बघण्याचा हा काळ आहे.
कंपन्या, व्यापार, धंदे, व्यवसाय आणि नोकऱ्या या सगळ्यांवर येणारं गंडांतर नं भूतो अश्या प्रकारचं असणार आहे.
आता त्यामुळे अर्थातच माणुसकी, मैत्री, नाती या सगळ्यांची कसोटी असणार आहे.
अश्या काळात आपण आपल्यातच खोल बघावं लागेल.आपले ताणेबाणे तपासावे लागतील आणि आपल्यावर अवलंबून कुटुंब आणि समाजा बाबत आपल्यालाच सारासार विचार करावा लागेल.
मुद्दा इतकाच आहे, की ऐका दिवसाने काय फरक पडतो,वगैरे च्या पुढे विषय गेला आहे.
करोना तुमच्या आमच्या सरकार, विचारधारा, धर्म जाती परंपरा यांच्या पार पुढचा आहे. या सगळ्यांना पराभूत करायला नव्हे तर चांगला धडा शिकवायला आला आहे, आपल्यातील माणूस आपल्याला ओळखायला लावणार आहे. आता तर ही सुरुवात आहे.
सगळ्यानी खेळीमेळीने, द्वेष, राग, मत्सर न करता या करोना शी लढावं लागणार आहे.
वेळ कमी आहे. या युद्धात अनेक जण आपल्याला कायमचे सोडून जातील अशी ही भयावह परिस्थिती आहे.
येणाऱ्या काळातील आर्थिक सामाजिक बंधनं आपल्याला खूप काही शिकवून जाणारी असतील.
आता इथला प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला आहे. विश्व ची माझे घर अशीचं ही अवस्था आहे.
दुसरीकडे जगभरातल्या लॉक डाउन मुळें ,पर्यावरण जरा मोकळा श्वास घेत आहे, जग विश्रांती घेत आहे. या विश्रांती चे अनेक अर्थ आहेत. हेतू आहेत. शक्यता ही दडलेल्या आहेत या विश्रांती मध्ये.
आपण सगळे नक्की कुठे चाललो आहोत? काय मिळवतो आहोत? कुणासाठी हे करत आहोत? या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा मग्न तटबंदीचा काळ आहे.
आपापल्या अवकाशात आपल्याला काही चिरस्थायी गवसतंय का ? हे शोधण्याचा प्रयत्न करूयात. शक्य तेवढी सगळ्यांची काळजी घेऊयात.
-मंदार फणसे