महाशक्ती अलका: कर्करोग म्हणजे फुलस्टॉप नव्हे, कॉमा...
X
बहुतेक मुली, महिलांना आजही विवाहापूर्वी पिता, विवाहानंतर पती, पुत्र म्हणतील तसेच वागावे लागते. यामुळे तिची मोठीच कोंडी होत रहाते. अशी कोंडी होऊ द्यायची नसेल तर महिलांनी स्वतःची भूमिका निश्चित करून, त्या भुमिकेशी ठाम राहिलं पाहिजे. तिच्या परिवाराने तिला पूर्ण साथ दिली पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन प्रेरक संवादक अलका भुजबळ करतात.
आपले स्वानुभव कथन करताना अलका भुजबळ सांगतात, माझा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्थित पार पडले. पण समाजाच्या रितीभातीनुसार वडील लग्नाचा आग्रह धरू लागले. त्यात मी दिसायला सुंदर असल्याने घर चालत स्थळं सांगून येऊ लागली. पण मला पदवीधर व्हायचंच होतं. केवळ श्रीमंत नाही, तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेला, स्वतःच्या पायावर उभा असलेला जीवनसाथी हवा होता. मी ऐकत नाही, असे पाहून वडिलांनी पुढे शिकविण्यास नकार दिला.
आई, वडील, दोन भाऊ अशा परिवारात मी एकटीच मुलगी होते. त्यामुळे माझे खूप लाड झाले असतील, असं आपणास वाटत असेल. पण तसे ते झाले नाहीत. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील बोरिंगर नॉल या कंपनीत वडील कामाला होते. आई दिवसभर बांगडीच्या दुकानात बसत असे. त्यामुळे सर्व घरकाम मलाच करावे लागे. त्यात मला पुढे शिकायचं होतं. पण मी शिकावं अशी वडिलांची इच्छा नसल्याने त्यांनी शिकवण्यास, शिक्षणासाठी पैसे देण्यास नकार दिला. मला मुळात डॉक्टर व्हायचं होतं. पण ते होता येणार नाही, हे पाहून निदान पदवीधर होण्याचा मी निर्धार केला.
त्याच दरम्यान त्यावेळच्या बॉम्बे टेलिफोन्सची टेलिफोन ऑपरेटरच्या जागेसाठी जाहिरात आली. मी अर्ज केला. परीक्षा होऊन माझी निवड झाली. घरकाम, नोकरी, शिक्षण करत करत वाणिज्य पदवीधर झाले. इतका सर्व काळ माझ्यासाठी स्थळं सांगून येत होतीच. अनुरूप नाही, असं पाहून मी ती नाकारत रहायची. निदान त्यावेळी तरी आमचा समाज व्यवसाय प्रधान होता. त्यामुळे मुलाच्या शिक्षणापेक्षा त्याच्या वडिलांचा, त्याचा व्यवसाय पाहिला जात असे. शिक्षणाला महत्व दिलं जात नसे. मला मात्र किमान माझ्या एव्हढा, वडिलांच्या नाही तर स्वतःच्या पायावर उभा असलेला साथीदार हवा होता. भले तो पैसेवाला नसला तरी चालेल अशी माझी स्पष्ट भूमिका होती.
चेंबूरला ज्या टिळकनगर कॉलनीतील इमारतीत आम्ही रहायचो त्याच इमारतीत देवेंद्र भुजबळ यांची सख्खी मावस बहीण कालिंदी बागेवाडीकर, त्यांचे पती, मुली, मुलगा रहायचे. देवेंद्र भुजबळ त्यावेळी मुंबई दूरदर्शन केंद्रात नोकरीला लागले होते. गम्मत म्हणजे, बागेवाडीकर यांच्या घरचा टेलिफोन आठवडा भर लागत नव्हता, म्हणून शेवटी एका रविवारी त्यांच्या आईचा निरोप देण्यासाठी ते बागेवाडीकर यांच्या घरी आले होते. ते आल्याचे कालिंदी मावशींनी माझ्या आईला कळवलं. आई, मोठा भाऊ विजय त्यांना बोलावला गेले. त्यावेळी एकमेव दूरदर्शन होते. दूरदर्शन मध्ये असणारे ते आमच्या समाजातील पहिलेच होते. त्यामुळे खूप जण त्यांना ओळखत.
पुन्हा बोलावणं केल्या वर ते आले. घरीच आम्ही सर्व जण असंच थोडा वेळ बोलत बसलो. त्या काळी निदान आमच्या समाजात मुलीने नटून थटून पाटावर बसणं, काही वाचून दाखवणं, गाणं, सुई ओवून दाखवणं असा कार्यक्रम असे. मला स्वतःला तसं कधी दाखवून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे त्या वेळी मी दाखवून घेतलं नाही. पुढे आमच्या भेटी झाल्या. विचार जुळले. इच्छित साथीदार मिळाल्याने विवाह केला. विवाहानंतरच अभिनय, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन, विविध शिबिरं असे अनेक उपक्रम पती देवेंद्र भुजबळ यांच्या सहकार्याने करता आले. विशेष म्हणजे माझ्या सासूबाईं, सुशिलाबाई भुजबळ यांना माझ्या सर्व उपक्रमांचं खूप कौतुक वाटायचं. त्या माझा सतत उत्साह वाढवायच्या. मुंबईत असतील तेव्हा,त्या आनंदाने माझ्या बरोबर यायच्या. त्या माझी आई नसून सासूबाई आहेत हे कित्येक जणांना सांगून खरं वाटायचं नाही.
पुढे मुलगी झाली. मुलगी देवश्रीलाही माझा अभिमान वाटत असल्याने तिची खूपच मदत होत राहिली, होत आहे. विशेषतः अडीच वर्षांपूर्वी माझ्या कर्करोगाचे निदान, त्वरित उपचार तिच्यामुळेच होऊ शकले. तिने,पतीने खूप धीराने परिस्थिती हाताळली. मलाही धीर देत राहिले. माझ्या कर्करोग लढ्यात डॉ. रेखा डावर खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. दोन वर्षांपूर्वी, महिला दिनी मी घरी एकटीच होते. प्रचंड एकटेपण वाटत होतं. आणि देवदूताप्रमाणें त्या माझ्या घरी आल्या. ते मोलाचे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आदर्श डॉक्टरांच्या त्या मुर्तीमंत उदाहरण आहेत. आयुष्यात मी कधीच आजारी पडले नव्हते. गर्भारपणात घ्यावी लागतात, ती तीन इंजेक्शन तेव्हढीच घेतली होती . बाहेरचं खाणं मला कधीच आवडायचं नाही. कितीही मोठया पार्टीला, कितीही मोठया ठिकाणी गेलो, आम्ही रात्री उशिरा घरी आलो तरी मी खिचडी का होईना, ती बनवून खात असे.
मी व्हॉलीबॉल भरपूर खेळायचे. पुढे ते बंद झाले. तरी मी सकाळ, संध्याकाळ बागेत फिरायला जात असे. इतकी सर्व स्वतःची काळजी घेऊन मला कॅन्सर होणं, लगेच तो दुसऱ्या टप्प्यात जाणं, अचानक त्याचं निदान होणं, हे सर्व खूपच धक्कादायक होतं. डावर मॅडमनी खूप धीर दिला. इतकंच नाही, तर त्यांच्या या सर्व परिस्थितीतुन गेलेल्या जाऊबाईंची ओळख करून दिली. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. पुढे भयंकर यातना देणाऱ्या केमोथेरपी सुरू झाल्या. दोन केमोथेरपी होईपर्यंत मला इतर लोक म्हणतात, तसा काही त्रास झाला नाही. त्यामुळे खरंच काहीं त्रास होतो, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. सर्व डॉक्टर यांचे उपचार, सिस्टर्सनी धीर देणं, घरच्यांची साथ यामुळे मी तोंड देत राहिले. ज्या पद्धतीने मी कॅन्सरला सामोरे गेले, ते पाहून प्रभावित झाल्याने माझी पहिली मुलाखत रिलायन्स वेब पोर्टल वर झाली.
स्वानुभवावर आधारित मी कॉमा हे पुस्तक लिहिलं. प्रसिद्ध डिंपल पब्लिकेशननं ते प्रकाशित केलंय. पुढे माय मेडिकल मंत्रा हे वेब पोर्टल, आकाशवाणी, दूरदर्शन वर माझ्या प्रेरक मुलाखती प्रसारित झाल्या. प्रसिद्ध लेखक - दिग्दर्शक आशिष निनगुरकर, निर्माती किरण निनगुरकर, सह निर्माते देवेंद्र भुजबळ यांनी सर्व टीम मिळून माझ्या जीवनावर कॉमा नावाचाच प्रभावी लघुपट निर्माण केला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन येथे तो २९ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाला. राज्यपाल महोदय हा १० मिनिटे कालावधीचा लघुपट पाहून खूप प्रभावित झाले. त्यांच्या प्रतिसादाने आमचं मनोबल खूप वाढलं.
लगेच आम्ही जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबई प्रेस क्लब- मुंबई मराठी पत्रकार संघ, नवी मुंबई महानगरपालिका, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कॉमा- संवाद उपक्रम केले. पुढेही करणार आहोत. या उपक्रमात सुरुवातीला कॉमा लघुपट दाखवला जातो. ५/७ मिनिटे मी बोलते. ८/१०मिनिटे आयोजक संस्थेने बोलावलेले डॉक्टर बोलतात. पुढील २५/३० मिनिटे ही शंका समाधानासाठी असतात. तिथेच कॉमा पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून देत असतो. कॉमा लघुपटाला इंग्रजी भाषेत सब टायटल आहेत. कॉमा पुस्तक अन्य भारतीय भाषेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपलं आरोग्य अमूल्य आहे. त्यामुळे ते बिघडणार नाही म्हणून,आपण आपली दिनचर्या, सकस आहार, व्यायाम, ध्यान धारणा करण्याचं, निदान पस्तिशीनन्तर आपले डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करणं आवश्यक आहे. सुखी, दीर्घ आयुष्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.
आता सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे कधी न मिळणारा वेळ आपणास मिळत आहे. त्यामुळे एरव्ही असणारी आपली वेळ मिळत नाही, ही सबब आता नाही. या परिस्थितीचा आपण आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी उपयोग करून घेऊ या. आपल्याला निरोगी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास काही मदत ,मार्गदर्शन हवे असल्यास जरूर संम्पर्क साधा.
मोबाईल क्रमांक आहे
:9869043300/9869484800.
धन्यवाद.
शब्दांकन:देवेंद्र भुजबळ.
Emai: devendrabhujbal4760@gmail.com