महिला दिनाच्या जबरदस्त हॅंगओव्हर नंतर...
डोकं भानावर ठेवून वाचा कारण हे फार महत्त्वाचं आहे.
X
जगातील प्रत्येक स्त्री ही सुंदर असते फक्त तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे यावर तिच्या सौंदर्याची व्याख्या खालीलप्रमाणे बदलत जाते.
आई, बहीण, ताई, बायको, मॅडम, सिस्टर, दिदी, काकू, मावशी, अॉंटी, आत्या या शब्दांनी अभिवादन करून झाल्यानंतर पुन्हा या आजच्या महिलादिनाच्या अमलाखालून बाहेर पडून माल, फंटी, टवका, मटण, लाईन, मटरेल, चार्वी, छावी, धमाका, सामान, माशूका यासारख्या असंख्य नावांचा जपनाम करणाऱ्या सर्वांना महिला दिनानंतरच्या पुढच्या ३६४ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! कारण पुढे हेच चालणार आहे. रांड, रंडी, कुलटा, धंदेवाली, चलवादी, लेस्बिअन हे तर काय आता परवलीचे शब्द झाले आहेत! पुढचे वर्षभर कुठेनकुठे हेच शब्द पाठलाग करत राहणार आहेत... पुढच्या महिला दिनापर्यंत!
महिला दिनाच्या हॅंगओव्हर मधून बाहेर आले असाल तर डोळे आणि डोकं भानावर ठेवून पुढील आकडेवारी पाहिली पाहिजे. सुन्न करणारे गणित आहे हे. NCRB(National Crime Record Beuro) च्या रिपोर्ट नुसार देशात दररोज सरासरी ८८ बलात्कार होतात (म्हणजे पंधरा मिनीटात एक बलात्कार). २०१७ मध्ये तीन लाख साठ हजार, २०१८ मध्ये तीन लाख ऐंशी हजार आणि २०१९ मध्ये चार लाख बलात्काराच्या केस नोंद झाल्या आहेत... ज्यांची नोंद नाही त्या घटनांची संख्या अगणित आहेत!
२०१९ साली स्त्रीयांसोबत अत्याचारांचे गुन्हे- १)उत्तर प्रदेश(५९०००) २)राजस्थान(४१०००) ३)महाराष्ट्र(३७०००) आणि ४)पश्चिम बंगाल(३००००). या लिखीत नोंदी आहेत, अलिखीत आकडा याच्या कितीतरी पटीत आहे! यांपैकी बलात्काराच्या घटना- १)राजस्थान (५९९७) २)उत्तर प्रदेश ( ३०६५) ३)मध्यप्रदेश (२४८५) ४)महाराष्ट्र (२२९९). सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत दरवर्षी ७ टक्क्यानी बलात्काराच्या घटना वाढत आहेत. भारतात बलात्काराच्या केसमधील गेल्या पाच वर्षांत फक्त ३० टक्के गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे, ७० टक्के गुन्हेगार निर्दोष मुक्त झाले आहेत. कदाचित याच असतील महिला दिनाच्या शुभेच्छा...!!
पवित्र अशा भारतीय संस्कृतीचा डंका इथे रोज पिटला जातो. हीच ती बुरसटलेली भारतीय संस्कृती जी वरील आकडेवारी रोज निर्माण करतेय. कोरोना वगैरे शुल्लक आहेत, स्त्रीयांवरील अत्याचार हा भारत देशात पसरलेला खरा रोग आहे. India is Rape Pandemic Country! २०१२ साली झालेल्या निर्भया प्रकरणापासून ते परवाच्या हाथरस प्रकरणापर्यंत झालेल्या बदल म्हणजे 'शून्य'. POCSO act 2012 (Protection Of Children from Sexual Offense) ची लक्तरे हाथरस प्रकरणात कशी वेशीवर टांगली ते आपण पाहिलंच आहे.
काल जागतिक महिला दिन होता, त्यामुळे थोडं जगाचं रेकॉर्ड पाहू. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात पुढच्या पिढ्यांसाठी जगाने स्त्रीयांबद्दल काय इतिहास लिहून ठेवला आहे ते बघू. दक्षिण आफ्रिकेत जगात सर्वात जास्त बलात्कार होतात. झोंबीयामधील लुसाका येथील शाळेत जाणाऱ्या ५३ टक्के मुलींसोबत शारिरीक अत्याचार किंवा बलात्कार झाले आहेत. त्यानंतर स्त्रीयांवरील अत्याचारात चीनचा क्रमांक लागतो. याविरोधात 'कडक' नियम आणि कायदे जवळपास प्रत्येक समुह आणि देशाने बनवले आहेत पण अंमलबजावणीमध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. स्त्रीची किंमत सगळीकडे सारखीच असते. अमेरिकेत दरवर्षी २७ टक्के गुन्हे हे लैंगिक अत्याचारांसंबंधीत नोंदले जातात आणि त्यांपैकी फक्त ३ टक्के गुन्हेगारांना शिक्षा होते. अफगाणिस्तानसारख्या देशात बलात्काराची शिक्षा ही मृत्युदंड आहे. असं असतानाही केवळ बोटावर मोजता येतील एवढ्याच केसेस समोर येतात, कारण दोघांचेही Honour Killing किंवा ज्याने बलात्कार केला त्यासोबतच लग्न लावणे हे तिथे सर्रास चालते. अल्जेरियाच्या पिनल कोड ३३६ नुसार बलात्कार हा खूप मोठा गुन्हा आहे पण 'बलात्काराची व्याख्या' कशी असेल ते कोर्ट परिस्थितीनुसार ठरवणार! बांगलादेशमध्ये २०१८ पर्यंत बलात्कार झाला की नाही हे तपासण्यासाठी 'Two Finger Test' केली जायची.
एकंदरीत मांडायचं झालं तर, जगातील सरासरी ३५ टक्के स्त्रिया स्वत:च्या आयुष्यभरात किमान एकदातरी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या असतात. म्हणजे तुमच्या सभोवताली असलेल्या तीन पैकी दोन स्त्रिया!
जगाच्या पाठीवर 'स्त्री' कधीच, कुठेच सुरक्षित नाव्हती आणि नाही. देवी, माता, निर्माती, सगळे ढोंग आहेत. वरील आकडेवारी सांगतेय की कोणताही समाज, देश, धर्म किंवा जगाचा कोणताही कोपरा जिथे माणूस पोहोचला आहे त्याठिकाणी मिळेल तिथे आणि मिळेल त्या मार्गाने स्त्रीवर अत्याचाराच झाले आहेत, होत राहतील. जगभरातील स्त्रीयांवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासंबंधी सर्वच देशांत कडक कायदे आहेत आणि सोबतच या कायद्यांना हजारो पळवाटा आहेत.
स्त्रीने स्वत:ला सदैव जागरूक आणि सशस्त्र ठेवणे हाच काय तो यावर एकमेव पर्याय आहे. सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असेलही पण खऱ्याखुऱ्या सामर्थ्याकडेसुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. महिला दिन वगैरे तेंव्हाच खरा सार्थकी लागेल, नाहीतर आहेच पंधरा मिनिटांत एक बलात्कार!
डॉ. प्रकाश कोयाडे