स्वयंपाक, वाचन आणि अभिनय... अभिनेत्री मुग्धा गोडबोलेंची मुसाफिरी
X
सायलीताईने (सायली राजाध्यक्षने) जे लिहिलंय त्यालाच पुस्ती.. मला कधीही स्वयंपाकाची आवड अशी नव्हती. आईकडे असताना भाज्या चिरून देणं, कणिक मळणं वगैरे कामं करायचे. पण प्रत्यक्ष स्वयंपाक मी कधीही केला नव्हता. आईने कधी फार आग्रहही धरला नाही आणि बहुतेकवेळा मी सकाळी उठायच्या आधी आईचा अर्धा स्वयंपाक झालेलाही असायचा.
मुंबईला आल्यावर एकटी राहताना थोडं फार करायला लागले. त्यातही पटकन होणारे पदार्थ ह्यांना प्राधान्य असायचं. पण खरा स्वयंपाक असा लग्नानंतरच करायला लागले. माहेरी आणि सासरी अतिशय रूचकर साधा सौम्य आणि शाकाहारी स्वयंपाक, त्यामुळे डोळ्यांवर आणि जिभेवर तेच संस्कार झालेले. मी मात्र सगळं शिकले. आता मला देशविदेशीचे व्हेज नॉनव्हेज पदार्थ उत्तम करता येतात (असं मीच म्हणत्ये) मी घरात बिर्याणी पिझ्झ्यापासून पुरणपोळ्या आणि चकल्यांपर्यंत सगळं करते. पण अजूनही मनातून मला त्याची आवड नाही. माझ्या पाककृतींचे फोटो काढून पोस्ट करण्याची मला कधीच इच्छा होत नाही कारण मला त्याबद्दल शाबासकी मिळवण्याची काहीच हौस नाहीये. मला दिवसात चार वेळा कुणीतरी आयतं गरम आणि साधं अन्न वाढलं तर मी ते अत्यानंदाने खाईन.
मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ह्यापलिकडे माझ्याकडे काहीतरी स्किल आहे ज्याची मला मनापासून आवड आहे, ज्यात माझं मन रमतं, तर मी ते करावं.
ह्यावरून मलाही judge करणारी अनेक माणसं आहेत कारण बाईला स्वयंपाक करता येणं ही अजूनही प्राथमिक अपेक्षा आहेच. ते नं करावंसं वाटणं म्हणजे बाईपणातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं अनेकांना वाटतं. मला रोज दिवसात दोन तास त्यात घालवण्यापेक्षा त्या वेळेत एखादं पुस्तक वाचावसं वाटतं हे अक्षम्य समजणाऱ्या बायकाच खूप जास्त आहेत हेही मला नक्की कळलं आहे. पण मी त्या देऊ केलेल्या अपराधीपणाच्या भावनेला फारशी बळी पडलेले नाही. (कारण मूळ कातडी गेंड्याची आहे)
वय वाढलं की सगळ्यातच शहाणपण येतं असं म्हणतात, सगळ्याचं माहित नाही पण मी स्वयंपाकाच्या बाबतीत नक्की शहाणी झाल्ये. नासधूस कमी झालीये, स्वयंपाकालाही एक शिस्त आलीये. पण तरीही मी सध्या सर्वात जास्त स्वयंपाकाच्या मावशींची वाट बघत्ये. gocoronago.. मावशी लवकर परत येऊ देत.