माणुसकी जपणारी वर्दीतील रणरागिणी !
X
आपण नेहमीच कुठेतरी चौकात किंवा नाक्यावर बंदोबस्ताला उभा असलेला पोलीस पाहतोच.. आणि सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात तर हातात दंडुका घेऊन कित्येकांना प्रसाद देताना आपण सर्वानी त्यांना पाहिलं आणि सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केलं... असो ! आपण सध्या यात न पडलेलंच बरं ! पण याच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये महिला पोलीस कर्मचारी देखील तितक्याच जिद्दीने आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत बरं का ! या महिला कर्मचारी आपलं घर , कुटुंब , मुलंबाळं सांभाळून कशा इतक्या ड्युटी करत असतील याचा आपण कधीतरी विचार केलाय का ? आणि सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरु असताना या कशा कुटुंबापासून दूर राहून काम करत असतील हे त्यांचं त्यांनाच माहित..! आता अशाच एक महिला पोलीस कर्मचारी बद्दल आपण बोलत आहोत..! या पोलीस कर्मचारी म्हणजे रजनी जाबरे ! मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक म्हणून त्या कार्यरत आहेत.. आणि गेली २५ वर्ष त्या आपलं पोलीस खात्यातील कर्तव्य बजावत आहेत.
इतर सर्वसाधारण महिलांप्रमाणे यांनाही कुटुंब आहे. कुटुंबात पती आणि दोन मुली असा यांचा प्रपंच ! पण पोलीस खात्यात कार्य करताना देखील यांचं सामाजिक भान तितकंच लक्ष वेधून घेत आहे.. आणि ते पाहताना अवाक झाल्या शिवाय आपण राहत नाही.. कदाचित आपली रोजची ठरलेली ड्युटी करून त्या काम करू शकल्या असत्या पण तेवढंच न करता जमेल तेवढे समाजकार्य करून त्या पोलीस प्रशासनाची शान वाढवत आहेत...
रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या कोणा अनोळखी व्यक्तीसाठी कित्येक तास थांबून , त्याला शुद्धीवर आणून , त्याचा पत्ता माहित करून , त्याला घरापर्यंत सोडणाऱ्या या एखाद्या देवदूतांपेक्षा नक्कीच कमी नाहीत..! अहो एखाद्याने सोशल डिस्टन्सिंग च्या नावाखाली त्या बेशुद्ध माणसाकडे ढुंकूनही पाहिलं नसतं कदाचित !
यांचा पगार किती ते माहित नाही आणि तो सांगण्याचा मला अधिकार सुद्धा नाही.. पण "तुम्ही पत्रकार सांभाळून काम करा आणि तुम्हा पत्रकारांना कोणतीही मदत लागली तर हक्काने सांगा , किती करेन माहित नाही पण जे शक्य आहे ते करेन..!" अशी विचारपूस करून आधार देतात तेव्हा त्या एखाद्या सरकारा पेक्षा नक्कीच कमी भासत नाहीत..
या आधीही त्या अनेकदा अडचणीत सापडलेल्या कित्येकांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.. मग मुसळधार पावसात अडकलेला सामान्य मुंबईकर असो किंवा पैसे नाहीत म्हणून एखादा गरजू असो.. या नेहमीच मदतीला तत्पर !
'सदरक्षणाय खल निग्रहणाय !' हे म्हणायला सोप्पंय हो पण ते अमलात आणायला तितकंच अवघड ! पण रजनी जाबरे या हि जबाबदारी लीलया पेलत आहेत.. आणि म्हणून निरपेक्ष काम करणाऱ्या अशा रणरागिणी ला सलाम ! कारण सध्यातरी आपण तेवढंच करू शकतो...!
- भूषण शिंदे