घरी चिठ्ठी आली, मी गरोदर आहे आणि तुमचा मुलगा मला नाकारतोय
तुमचा मित्र साडी नेसतो डिट्टो महिलेसारखा दिसतो. तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढता आणि तो फोटो तुमच्या घरचे बघतात आणि ‘या दोघांचं आहे’ असा घरचांचा गैरसमज होतो. मग काय पुढं काय होत ते सांगण्याची गरज नाही.. ही जरी काल्पनीक कथा वाटत असली तर हे ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या सोबत घडलं आहे. वाचा त्यांच्याच शब्दात...
X
तुमचा मित्र साडी नेसतो डिट्टो महिलेसारखा दिसतो. तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढता आणि तो फोटो तुमच्या घरचे बघतात आणि 'या दोघांचं आहे' असा घरचांचा गैरसमज होतो. मग काय पुढं काय होत ते सांगण्याची गरज नाही..
ही जरी काल्पनीक कथा वाटत असली तर हे ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या सोबत घडलं आहे. वाचा त्यांच्याच शब्दात...
नेहमीप्रमाणे सकाळी आईने दरवाजा उघडला. दाराच्या कडीला अडकवलेली एक पिशवी दिसली. कुतूहलाने तिने पिशवी उघडून पाहिलं तर एक चिठ्ठी आणि फ्रेम केलेला फोटो होता.
तो फोटो पाहिल्यावर मात्र तिचा चेहराच पडला. तडक तिने तो फोटो आणि चिठ्ठी भावाच्या हातात ठेवली. भाऊ तर दचकलाच...
प्रिय आई,
साक्षात दंडवत,
तुमचा मुलगा मला एका प्रवासात भेटला. मी भाळले आणि प्रेमातच पडले. पुढे जे व्हायचं ते झालं. आता तुमचा मुलगा मला नाकारतोय. मी गरोदर आहे.
काय करू, लपून छपून रहात आहे. आई मला न्याय द्या, पदरात घ्या....
अशा आशयाची ती चिठ्ठी होती.
घरात सुतकी वातावरण पसरलं. कुणी माझ्याशी बोलेना. घरात नातेवाईक येवू लागले. बैठका सुरू झाल्या. पण माझ्यासमोर कुणी काही बोलेना. नुसते माझ्याकडे बघत बसायचे... त्यात माझी शिबिरं, बैठका यांचे दौरे सुरू होते.
एकदा चार दिवसांनी घरी आलो. आई खायला प्यायला सगळं द्यायची. पण बोलेना. आज संध्याकाळी मिटिंगाफिटिंगाना कुठे जावू नकोस. महत्वाचं काम आहे... एवढंच ती म्हणाली. मी हो म्हटलं.
संध्याकाळी नातेवाईक आले. मी आपला मजेत टीकाटिप्पणी करतोय. हे मात्र सगळे टेन्स चेहऱ्याने.... चहापाणी झालं.
आता काय ते इचारा नीट.... आईने कोंडी फोडली.
हो, आता कामाचं बोलू म्हणत भावाने माझ्या हातात हा फोटो आणि चिठ्ठी ठेवली...
सगळे माझ्याकडे रोखून बघू लागले...
मी फुटलोच... पुरेवाट!!!
मी पोटधरून हसतोय नी सगळे एकमेकांकडे गंभीरपणे पहातायत.
हसतां हसता गेले काही दिवस जे चाललं होतं ते माझ्या लक्षात आलं. मी डोळे पुसत म्हटलं...
- अरे असं काय करताय? हा माधव आहे. हा आमचा नाटकातला फोटो आहे....
- कोण माधव??? - आई
- अगं माधव गायकवाड
भ या ण शांतता...
एकेकजण उठत पायात चप्पल घालून बाहेर पडू लागला....
त्या मेल्या माधवला येव दे आता, मं बघते... असं म्हणत आईने मला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला. तिच्या चेहऱ्यावरचा तणाव दूर झाला होता...
मेल्या Madhav Gaikwad Happy Birthday ❤️