खतरे में कौन हैं ?
X
खर तर खतरे में….. हा कुठलाही धर्म नाही तर आपल्या राष्ट्राचे ऐक्य, विविधता व संस्कृती हेच धोक्यात आहे !
आज #हिजाब वरून वाद पेटलेला दिसत आहे. पण मला असे वाटते की, हा केवळ हिजाब किंवा कुठल्याही धर्माच्या पेहरावाचा किंवा ड्रेस कोडचा मुद्दा नाही. तर एका विशिष्ट धर्माचे आचरण करणारया विद्यार्थी वर्गाच्या विरोधात असलेल्या संस्थात्मक भेदभावाचा आणि परस्परांच्या अधिकारांवर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींचा आहे !
कुठल्याही धर्माचे उदात्तीकरण हे विनाशाकडे नेणारे असेच आहे. पण या विनाशाची सुरवात आपल्या देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अश्या विद्यार्थी वर्गात झालेली दिसत आहे ही चिंतेची बाब आहे. आज कटकाच्या एका व्हिडिओमध्ये पाहयाला मिळाले की, एक हिजाब घातलेल्या विद्यार्थीनीचा, जय श्री रामचा नारा देत असलेल्या मुलांनी पाठलाग केला. वास्तविक कुणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच 'Choice' हा देखील महत्वाचा मुद्दा आहे पण नेमकं हेच सरळ सोपं गणित लक्षात न घेता ज्या पध्दतीने वाद पेटवला जात आहे…. हे कश्याचे द्योतक आहे ?? हीच राष्ट्रीय ऐक्य धोक्यात असल्याची सुरवात तर नाही ना ?? राजकीय डावपेचासाठी आखलेला पुर्वनियोजित कट तर नाही ना?? विद्यार्थी, महिला व युवा वर्गाला हाताशी धरून धर्मवादी संघटना त्यांचा अजेंडा तर पुढे नेत नाहीत ना ??…… हे आणि असे अनेक प्रश्न आजचा व्हिडीओ पाहून मनात वारंवार येत आहेत. या सगळ्याची चिंता वाटते, कारण …. आज दुर्दैवाने धर्मांधतेचे वाद शिक्षण संस्थेत घडत आहे, सुशिक्षित विद्यार्थी जर या धर्मांधतेला बळी पडत असतील तर हा आपल्या संपुर्ण राष्ट्रासाठीच एक धोक्याचा इशारा आहे…….!
धर्मांधता अखंड राष्ट्रासाठी घातकच असते. हीच धर्मांधतेची प्रवृत्ती आपल्याला पोशाख, अन्न आणि धर्म यामध्ये विभाजित करते आणि पुढे याचेच उच्चाटन झाल्यास हिंसेचा पर्याय निवडला जातो. प्रत्येक क्रियेची समान प्रतिक्रिया असते हेच आजच्या घटनेतून आपल्याला दिसून आले हे वेळीच थांबयला हवे; यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे.
मला वाटते की, जर तुम्हाला एखाद्या समुदायाची ओळख सहन करायची नसेल, त्यांचे अधिकार मान्य नसतील तर… तुम्हांला आपल्या भारताच्या एकसंघ, बहुसांस्कृतिक, विविधेत ऐकता या मूल कल्पनांचा पुनर्विचार केला पाहिजे, म्हणून आजची घटना पाहता आपण सर्वांनीच यावर सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
मनाली भिलारे