ती एक योध्दाच!
X
कोरोना माहामारीत आपण डॉक्टर, नर्स, पोलीस आणि तत्सम सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना माहामारीशी लढल्यामुळे सत्कार केला. मात्र आजही समाजातील एक घटक यापासून खूप दूर आहे. तो म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला. हो या कोरोना माहामारीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांनी खूप मोठा संघर्ष पाहिलाय.
घरकाम करून आपलं घर चालवणाऱ्या या महिलांनी कोरोना माहामारीच्या काळात हाताला काम नसताना देखील आपल्या मुलाबांळांचा जिकरीने सांभाळ केला आहे. कोरोना माहामारीच्या काळात जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं. अनेक तरूणांनी नोकऱ्या गमावल्या अनेकांनी आपला जीव गमावला, आजूबाजूला इतकं नकारात्मक वातावरण असताना देखील घरकाम करणाऱ्या अनेक महिलांनी या परीस्थितीशी लढा दिला.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनलॉक झाल्यावरही त्यांना कोरोना काळात अनेक ठिकाणी उपेक्षाच मिळाली. पण त्या डगमगल्या नाहीत. जसा जसा काळ लोटला कोरोनाची भीती कमी झाली आणि तब्बल ६ महिन्यांनी या महिलांना पुन्हा कामावर जातं आलं.
आपल्याकडे घरकाम करणाऱ्या महिलांना अनेकवेळा गरिब आणि उपेक्षीत म्हणून पाहिलं जातं. मात्र बाहेरील अनेक देशांमध्ये घरकाम करणाऱ्या अशा महिला म्हणजे सर्वात महत्वाची व्यक्ती मानली जाते. त्यांना सर्व सोई-सुविधा पुरवल्या जातात. आपल्याकडे हे शक्य नसलं तरी त्यांना आदराने पाहण्याची मानसिकता तयार व्हायला हवी. स्वतःचं घर सांभाळून इतरांच्या घरची धुणी-भांडी करणाऱ्या या महिला म्हणजे एक योध्दाच आहेत. कारण त्या एकावेळी दोन घरांचं वात्सल्य जपत असतात.