"राज ठाकरेंना हात तर लावून दाखवा..." शालिनी ठाकरेंचं उध्दव ठाकरे सरकारला आव्हान
राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणावर तसंच इतर आणखी मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे यांची बेधडक मुलाखत
X
गेल्या महिनाभरापासून मनसेने भोंग्यांचा विषय उचलून धरला आहे. १ मेला औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. या भाषणात त्यांनी राज्य सरकारला ३ ममे नंतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर बुधवारी राज्यभरामध्ये मनसैनिकांनी अजानविरूध्द हनुमान चालिसा असं आंदोलन केलं. या सगळ्यावर आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्याशी बातचित केली. या या वेळी बोलताना त्यांनी जर राज ठाकरेंना अटक झाली तर कायदा आणि सुव्यव्स्थेचा प्रश्न काय असतो याची जाणीव होईल. असं आव्हानच थेट मुख्यमंत्र्यांसह सरकारला दिलं आहे.
प्रश्न १ : कोव्हिड १९ नंतर मनसे अचानक ऍक्शन मोडमध्ये आली आणि भोंग्यांचा प्रश्न लावून धरला आहे, मनसेची पुढची दिशा काय असणार आहे?
उत्तर : मला वाटतं शुभम आपली काहीतरी गल्लत होतेय. कोव्हिड १९ च्या काळात जितकं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलंय तितक दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं नाही. दुसरा कोणताही पक्ष लोकांसाठी रस्त्यावर उतरला नाही. मला अभिमान आहे की औषधं देणं असो किंवा उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणं असो महाराष्ट्र सैनिक कायम आघाडीवर होता.
प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. या आधीही तो आम्हीच उचलून धरला होता. सर्वात आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भोंग्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. राज ठाकरेंनी हाच प्रश्न निवडला कारण हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. लोकांना ध्वनिक्षेपकांचा त्रास होतो. आज कुठेही गेलात तरी आपल्याला ध्वनिप्रदुषणाचा त्रास होतो. घरात लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरीक आहेत. आम्हा सगळ्यांना याचा त्रास होतोय. हे कमी झाल्यास त्याचा फायदा हा सगळ्यांनाच होणार आहे.
प्रश्न २ : आपण किताही म्हणालात तरी सत्ताधारी पक्षांकडून याला धार्मिक रंग दिलाच जातो. दोन समाजांमध्ये राज ठाकरे दुही माजवतायत अशी वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात आपण याकडे कसं पाहताय?
उत्तर : सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते या प्रश्नाला असा रंग देतायत. पहिल्या दिवसापासून राज ठाकरे सांगत आहेत की हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. ते फक्त मशिदीवरील नाही तर सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवायला सांगत आहेत. नव्हे तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करायला सांगत आहेत. इतका साधा हा विषय आहे. पण जाणूनबुजून याला एक धार्मिक रंग दिला जातोय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचं हिंदुत्व हे कधीच मागे पडलंय. आघाडीतील इतर दोन पक्षांना पटत नसल्यामुळे त्यांना जबरदस्तीने ते बाजूला ठेवावं लागलंय. त्यांना वाटतंय की धार्मिक रंग देऊन तणाव वाढला की बालंट मनसेवर येईल पण मला असं वाटतंय की लोकांना मुळ मुद्दा कळाला आहे. ज्याप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय, सकाळची अजान कायद्याप्रमाणे झाली त्यावरून एकच म्हणावं लागेल की ज्यांना हा विषय समजतोय ते कायद्याचं पालन करतायत.
प्रश्न ३ : संदिप देशपांडे आणि संतोष धुरींना ताब्यात घेताना झालेल्या झटापटीत महिला पोलिस जखमी झाल्या यावर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी संदिप देशपांडेवर कारवाईचे आदेश आयुक्तांना दिलेत, आपली यावर प्रतिक्रीया काय? त्या महिला पोलिसाची आपण भेट घेतलीत का?
उत्तर : मी अजुनही त्या महिला पोलिसांची भेट घेतलेली नाही. मला वाटतं राजसाहेबांनी पत्रकार परिषदेत या विषयावर विशेष लक्ष वेधलं. त्यात त्यांनी म्हटलंय ही जी कारवाई होते ती फक्त आमच्यावरच का होते. आम्ही तर लोकांना कायद्याचं पालन करण्याचंच आवाहन करायला सांगत आहोत. जे कायद्याच पालन करत नाहीत ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही अशांवर काहीच कारवाई केली जात नाही. गेले काही दिवस जर आपण पाहिलंत ब्राम्हणांवर किती विविद वक्तव्य केली गेली, अबू आजमींची वक्तव्य आपण ऐकलीत का? त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवी का होत नाही? कारवाई फक्त महाराष्ट्र सैनिकांवरच का केली जाते. गुन्हे फक्त राज ठाकरेंवरच का दाखल केले जात आहेत.
आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं अजुनही सरकारतर्फे मिळालेली नाहीत. उलट आमच्याच कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या जातायत. त्यांना अटक केली जातेय. याचाच अर्थ आघाडी सरकार घाबरलंय. लोकांचा आमच्याकडे वाढलेला कल पाहून त्यांना भिती वाटतेय. त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला झालेल्या इजे बाबत मी त्यांची जाहीर क्षमा मागते. हा सगळा खेळ राज्य सरकारने रचला आहे. दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री भोंग्यांवर कारवाई करतात आणि तिथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नसेल तर तो फक्त महाराष्ट्रातच निर्माण होणार आहे का? म्हणजेच काय तर या प्रकरणात राज्यसरकार कुठेतरी कमी पडतंय असंच म्हणावं लागेल.
प्रश्न ४ : १ मे च्या सभेमध्ये राज ठाकरेंकडून १६ पैकी १२ अटींचं उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर अजामीन पात्र कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तसं झाल्यास पक्षाची भुमिका काय असणार आहे?
उत्तर : जेव्हा त्या अटी लावल्या गेल्य़ा तेव्हाच आमच्या लक्षाचत आलं होतं की त्या अटींचं पालन करणं शक्य नाहीये. खरं तर आम्हाला या सगळ्याची सवय झालीये. राज ठाकरेंवर किती केसेस आतापर्यंत दाखल झाल्या आहेत हे साऱ्या जगाला माहितीये. नोटीशी मिळणं, अटक होणं या सगळ्याची आमच्या मनसैनिकांची तयारी झालेली आहे. त्यामुळे यात काही नविन आहे असं मला वाटत नाही. पण आम्ही बोललो की तुम्ही आमच्यावर केसेस टाकणार आणि दुसरे बोलले की त्यांच्यावर तुम्ही काहीच कारवाई करत नाहीत. एक इथे सांगते, राज ठाकरेंना कुणीही काहीही करू शकत नाही. आम्हाला जे आदेश आलेले आहेत त्याचं आम्ही पालन करणार. तुम्ही फक्त राज ठाकरेंना हात तर लावून दाखवा मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कसा उभा राहतो ते तुम्हाला कळेल.
प्रश्न ५ : राज ठाकरेंची १ मेच्या सभेमधील भाषा ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला छेद देऊन धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे असं वाटत नाही का आपल्याला?
उत्तर : पहिला मुद्दा असा की जेव्हा ती अजान वाजली ती त्या अजानची वेळच नव्हती. ती अजान ही ८.१७ ला होणं अपेक्षित होतं पण ती झाली ८.४५ ला त्यामुळे ती वेळ नव्हती अजान वाजवण्याची. राज ठाकरे हे अधिकृत आणि कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करतात. गेल्या काही महिन्यांपासून जे नेते महिलांबद्दल वाईट वक्तव्य करतायत, कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करतायत त्यांच्या विरोधात माध्यमं ब्र देखील काढत नाहीत. पुढच्या पिढीला हे असे राजकीय नेते लाभलेत जे शिवराळ भाषा सर्रास वापरतात. मला कुणाचंही नाव घेउन त्यांना मोठं करायचं नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की राज ठाकरेंनी अशी कोणती भाषा वापरली आहे. सभेच्या वेळी मुद्दाम अजान वाजवली गेली आणि त्यामुळे राज ठाकरेंनी पोलिसांनी ती अजान थांबवण्याची विनंती केली. राज ठाकरेंनी त्यांची भुमिका ही पुर्वीपासूनच स्पष्ट केली आहे. राज साहेबांनी दिलेला अल्टीमेटम पोलिसांनी आणि सरकारने गांभिर्याने घ्यावा म्हणून त्यांनी ती भाषा वापरली.
प्रश्न ६ : मनसे मध्ये महिला नेतृत्वाचा अभाव असताना रूपाली पाटील यांनी देखील पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत गेल्या. वसंत मोरेंप्रमाणे त्यांना का नाही थांबवलं?
उत्तर : आपला चुकीचा समज झाला आहे. राज ठाकरेंच्या मागे महिला ठामपणे उभ्या आहेत. आपण कुठेही पाहिलंत तरी ग्राउंड लेव्हलला मनसैनिक महिला काम करताना दिसतील. मनसेचा कोणताही कार्यक्रम पाहा आम्हाला भाड्याने महिला आणाव्याच लागत नाहीत जे इतर पक्षांना करावं लागतं. महिलांना राज ठाकरेंचे विचार पटतात त्यामुळे त्या आपणहून सभा, कार्यक्रमांना उपस्थित राहतात. विभागीय स्तरावर मनसेचं महिला नेतृत्व अगदी चांगलं आणि खंबीर आहे फक्त त्यांना कॅमेऱ्यावर बोलता येत नाही. पक्षाची महिला सेनेची बांधणी ही अतिशय मजबूत आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या वक्तृत्वाचा तर त्यातही हळूहळू सुधारणा होईल.
रूपाली पाटील यांचं वेळोवेळी राज ठाकरेंसोबत बोलणं होत होतं. प्रत्येक वेळी कोणतंही काम असेल तर त्या राज ठाकरेंचा सल्ला घेऊनच करत असत. शेवटी प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते आणि त्या महत्वाकांक्षेपोटीच त्यांनी पक्ष सोडला आणि त्या दुसऱ्या पक्षात गेल्या.
प्रश्न ७ : भाजपचे अनेक मातब्बर नेते, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत. मनसे भाजप युती होणार का?
उत्तर : राज ठाकरेंचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत विशेषतः काही महत्वाच्या नेत्यांसोबत अगदी घरगुती संबंध आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या नव्या घरात झालेल्या गृह प्रवेशामुळे अनेक जण त्यांना भेटायला येत आहेत. आमचा राजकीय प्रवास हा एकट्याने सुरूच आहे. भाजपसोबत युती होणार की नाही हा संपुर्ण राज ठाकरेंचा निर्णय आहे पण तुर्तास तरी मला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. आम्ही इतर पक्षांसाठी बोलतो हे आरोप आमच्यावर नेहमी केले जातात. त्यामुळे हे काही आमच्यासाठी नवं नाहीये.