महिला उद्योजकांना सक्षम करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे महिला उद्योजकता कार्यक्रमाची सुरुवात
X
महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करण्याच्या आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाउल म्हणून, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (NSDC) महिला उद्योजकता कार्यक्रम सुरु केला आहे. महिलांना व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना येणाऱ्या वेगळ्या आव्हानांवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागीदारीने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांना आर्थिक अनुदान उपलब्ध केले जाईल, तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा स्किल इंडिया डिजिटल हबवर प्रदर्शित केली जातील, ज्याद्वारे महिला उद्योजकांसाठी सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देण्याची दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होईल. महिला उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करून ब्रिटानियाने आमच्याबरोबर भागीदारी केली, हा आमचा मोठा सन्मान आहे, असे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी म्हणाले. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु उद्योग विकास संस्था, तसेच आदिवासी व्यवहार मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय आणि इतर मंत्रालयांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण उद्योजकतेमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचे त्यांनी नमूद केले. जनशिक्षण संस्थे अंतर्गत कौशल्य विभागातील प्रशिक्षणार्थीमध्ये 82% महिला आहेत, तसेच PMKVY अल्प-मुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात, जवळजवळ 45% महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची कौशल्ये, ज्ञान आणि नेटवर्किंगच्या उपलब्ध करून उद्योजकतेमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्किल इंडिया डिजिटल हबवर (SIDH) अनेक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या स्वयं-प्रशिक्षण मूलभूत उद्योजकता अभ्यासक्रमांनी, हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, सहभागींना NSDC, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि NIESBUD कडून त्यांच्यामधील उद्योजकता कौशल्ये आणि क्षमतांची पावती देऊन सह-ब्रँडेड प्रमाणपत्र दिले जाईल. देशभरातील अंदाजे 25 लाख महिलांना यशस्वीपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि संसाधने प्रदान करून सक्षम बनवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा समारोप एका भव्य समारंभामध्ये होणार असून, यावेळी पहिल्या 50 स्थानांवरील स्पर्धक त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना प्रतिष्ठित निवड समितीसमोर सादर करतील. नवोन्मेष आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज पहिल्या 10 यशस्वी स्पर्धकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक अनुदान देईल.
महिला उद्योजकांना आवश्यक कौशल्यांचा विकासाच्या संधी उपलब्ध करून, स्वयं-प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश सुलभ करून, त्यांचा सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.