मुलींना बंडखोर करणारा माणूस...
X
माझ्या एसीकच्या,बडेकर निवासाच्या (जो पुढे किशोरचे घर म्हणून प्रसिद्ध झाला) दुसऱ्या माळ्यावरील घराच्या गॅलरीला मी माझा कबाडखाना बनवला होता. डायनिंग टेबल म्हणजे पुस्तकांचा डोंगर झाला होता. या गॅलरीत माझ्या शेकडो गोष्टी होत्या
ही जुनी माझी पिशवी, माझ्या एका झोळीत असायची. जी मी काही वर्षांपूर्वीच सचिन सुतारच्या हवाली केलीय.
या पिशवीत वेगवेगळी आकर्षक पुस्तकं घेऊन मी वस्ती जवळच्या गार्डन मध्ये जाऊन बसायचो.
झोळीत खेळणी असायची आणि विविध जादूचे खेळ आणि खाऊपण असायचा. ज्याला जे आवडेल ते त्याला 2 तासासाठी द्यायचो, मग गप्पा गाणी करायचो, एकांडा शिलेदार असायचो, भणंग बनून फिरायचो, चुणूकदार मुले निवडायचो आणि त्यांचा फॉलोप घ्यायचो.
गर्दी मी कायम टाळली. मला दर्दी आवडले... आजही मी दर्दी लोकांमध्ये रमतो. जे वेगळे बोलतात, ज्यांची आवड वेगळी आहे, ज्यांना वेगळे करायला आवडतं. जास्त नाही टिकलं हे, चारपाच महिने, आठवड्यातून एकदा ही भटकंती सुरू व्हायची. फरक जाणवायचा मुलांच्या जगण्यातला
नोकरी नाही करायची हे ठरलंच होतं. पण तरीही काही दिवस मी काम केलं, एका टाळा बनवण्याच्या कंपनीत जायचो, मुंबई सर्वोदय मंडळ मध्ये टि के सोमय्या यांच्या सोबत काम केलं. नवीन गोष्टी सुरू केल्या, बिल्ड या संस्थेत काही काळ काम केले, मुंबईत नर्मदा आंदोलन सुरू झाले आणि मी नर्मदामय झालो, आणि डी एन नगरच्या अपना बाजारच्या दारात रसिक वाचनालयात काही काळ काम करून वाचनालयाचे रंगरूप बदलले वगैरे वगैरे बरेच... आता आठवत नाही पण दीर्घकाळ कुठेच रमलो नाही.
रमलो थोडा, स्वतःच्या व्यवसायातच त्यातही जास्त कॅनवसिंग करण्यात. पुढे त्यात अनेक मित्र उभे केले. पल्स सारख्या मल्टीमार्केटिंग कंपनीत एक वर्ष नावाला काम केलं. पण मजा आली फक्त ट्युशन मध्येच. आईला हातात इप्सित पैसे द्यायचो बाकी चकटफु आणि बागशाळा...
आजही माझी आई हिशोब करते. कोणी कोणी किती फी बुडवली व किती येणे आहे... एकदिवस निर्णय घेतला आपण काय करू शकतो आणि ठरवलं आपल्याला नवीन पिढीतील सोनं शोधायचे आहे , आपल्याला फक्त देशसेवा करायचीय गांधी, आंबेडकर, सानेगुरुजी,गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा चालवायचाय... दोन दिवसातच निर्णय घेतला
खुप अडचणी आल्या. कुणी भिकारी म्हणून आईला हिणवले, मुलींना शिकवतो, बंडखोर करतो म्हणून त्यांच्या घरच्यांनी शिव्या दिल्या. मुलांना गोळा करून हा राजकारण करणार म्हणून शँका आली म्हणून भीतीने माझ्या साथींना मारले, माझ्यावर शिवसैनिकांनी जीवघेणे हल्ले केले, पण मी मागे हटलो नाही ते आजपर्यंत.
सुरवातीला ध्येय होते मुलांना दहावी पास करायचे. शाळेचा छान अनुभव त्यांना मिळालाच पाहिजे.
मग वाटले नाही मुलांनी कॉलेजचा अनुभव घेतला पाहिजे, आणि जसा मी टी वाय ला आलो तसे वाटले, गरीब वस्तीतल्या मुलांनी सुध्दा उच्च शिक्षण घेतले पाहिजे. त्यांची क्रिएटिव्हिटी सडता कामा नये. ज्याला जे करावेसे वाटते ते करायला आपण मदत करू, भारत शिक्षणातूनच बलवान बनेल, बलशाली बनेल...
रद्दीतील पुस्तकांच्या वाचनाने शिक्षणच अमृत असल्याचे आणि शिक्षणच संजीवनी असल्याचे जाणवले... मग झोळीत फळा कायम राहिला आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी, शरीराची ढाल करून, बुलंद केला आवाज.
ते काम अजून चालू आहे, चालू राहील, अगदि रिले दुसऱ्याच्या हातात दिला तरी...
- किशोर पवित्रा भगवान जगताप
लेखक विद्यार्थी भारती या संघटनेचे संस्थापक आहेत