गरोदर महिलांसाठी Covid-19 प्रतिबंधात्मक लस सुरक्षित आहे का?
X
आजपासून मुंबईत गरोदर महिलांसाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. महापालिकेच्या 35 लसीकरण केंद्रांवर गरोदर आणि स्तनदा मातांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु अद्यापही अनेकांच्या मनात गरोदर महिलांनी लस घ्यावी की नाही अशा शंखा घर करून बसल्या आहेत. त्याच बरोबर लस घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याची भितीही मनामध्ये आहे. गरोदर महिलांनी आपल्या बाळावर या लसीचा काही दुष्परिणाम तर होणार नाही ना ? असे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच कोरोना व्हायरसपासून गरोदर महिलांनी आपला बचाव कसा करावा? कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे? त्याच बरोबर रिपोर्ट पॉसिटिव्ह आला तर कोणती खबरदारी घ्यावी? या सगळ्या प्रश्नांसंदर्भात मॅक्सवुमन ने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याशी बातचीत केली आहे.
डॉ. राजश्री कटके सांगतात की, गर्भवती महिलांना तीव्र संसर्गाचा धोका असतो. गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसुती होण्याचे प्रमाण अधिक आहे. 10 टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्तीविषयक औषधोपचार, डायलेसिस, हृद्यरोग अशामुळे कोविड होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे महिला आणि बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे फायदेशीर आहे. त्याचबरोबर गरोदर महिलेला कोरोनाची लक्ष आढळल्यास त्वरित त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.