जळगाव : ऑक्सिजन न मिळाल्यानं महिलेचा रस्त्यातच मृत्यू
राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना. जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी एका महिलेला प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
X
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्याने एका महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या 11 रुग्णांना तातडीने जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यातच एका कोरोनाबाधित महिलेचा अँब्युलन्समध्ये मृत्यू झाला. मृत महिला ही ढालसिंगी या गावातील आहे. घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा
जळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. आधी चोपडा, त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता. तर, आता जामनेरातही हेच चित्र पहायला मिळाले. रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने आणि त्यातही गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने ऑक्सिजनची मागणी दररोज वाढत आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात 52 बेडची व्यवस्था आहे. त्यापैकी 18 ऑक्सिजनचे बेड आहेत. सर्व बेड फुल असून दररोज तब्बल 35 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत आहे. असे असताना दररोज फक्त 20 ते 25 सिलिंडरचाच पुरवठा होत आहे. त्यामुळे दिवसा 12 व रात्री 10 सिलिंडर अशाप्रकारे ऑक्सिजन पुरवून रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासन करत आहे.
रोज हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह रुग्णांची भर
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा स्फोट झाला आहे. दररोज हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये फुल झाली आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीये. बेड मिळाला तर रेमडीसीवर मिळत नाही आणि आता तर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने नवं संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी
जिल्ह्यात 24 तासात 1033 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अढळले आहेत. सध्या 11 हजार 239 रुग्ण ऍक्टिव्ह असून उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1 लाख 7 हजार 103 रुग्ण बाधित झाले आहेत. तर 93 हजार 973 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 1888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.