CoronaVirus: पेशंट उपचार सोडून पळतायत का?
X
सध्या महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करत आहे. ते खूप कौतुकास्पद आहे. शासन आणि प्रशासन खांद्याला खांदा लावून आपल्या पूर्ण ताकदीने निर्णय घेत आहे. आणि त्याची अंमलबजावणी करत आहे. मंत्रालयापासून अंगणवाडीपर्यंत व्यवस्थापन कामाला लागले आहे. कधी नव्हे ते कसलंही राजकारण, आरोप, प्रत्यारोप न करता सगळे एकजूट होऊन उभे आहेत हे खूप आश्र्वासक आहे.
ज्या कोरोना वायरस ने जगाच्या हृदयाचा ठेका चुकवला त्याने भारताचा उंबरठा ओलांडला आहे. पुढचे काही आठवडे आपल्यासाठी अत्यंत नाजूक काळ असणार आहे. ही एकप्रकारची वैद्यकीय आणीबाणी आहे! शासनाने घालून दिलेले नियम आणि संकेत खूप साधे सरळ आहेत… प्रत्येकाने आपापल्या परीने तेवढे पाळले तरी आपण ते संकट कमीत कमी हानी होऊन परतवून लावू शकतो.
सर्वात जास्त काळजीची गोष्ट ही आहे की, पेशंट विलगीकरण कक्षातून पळून जात आहेत. शासनाने आता डॉक्टर, नर्स पुरवायचे की पोलिस? पळून गेलेला एक पॉझिटिव्ह पेशंट किती जणांना बाधित करेल सांगता येत नाही. शासन एक रूपयाही न घेता सर्व सोयीनीशी उपचार करत आहे, कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशावेळी पॉझिटिव्ह रूग्णांनी शांत राहून साथ देणं आवश्यक आहे. खरंतर पेशंट पळून गेला तरी पोलिस त्याला परत शोधून आणणारच आहेत मग मधला ‘गोल्डन पिरेड’ का वाया घालवायचा?
याचं एक महत्त्वाचं कारण आपल्या समाजातच लपले आहे. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट हे साधारणपणे बदनामीला घाबरत आहेत. संशयित किंवा बाधीत रूग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना वाळीत टाकण्याचे एक-दोन प्रकार दिसून आले आहेत. हा प्रकार कितपत योग्य आहे हे ज्यानं त्यानं ठरवावं. टीव्ही चॅनल्स वर बातम्या दाखवत आहेत… अमुक ठिकाणी एक पेशंट सापडला, अमुक ठिकाणाहून दोघांना उचलले. ते काही भयंकर प्राणी नाहीत… खोकला ताप आलेले साधारण लोक आहेत. ज्यांना उपचाराची गरज आहे. उपचारही असे काही घाबरून जाण्यासारखे नाहीत. वेगळे कक्ष आहेत, नेहमीसारखीच औषध, गोळ्या, सलाईन आणि एक दोन टेस्ट आहेत एवढेच. कोरोनाचा एक पेशंट उपचार घेता घेता लॅपटॉपवर आपले दैनंदिन काम करताना मी पाहिलाय… आणखी किती धीर द्यायचा? अगदी उच्चशिक्षित रूग्ण पळून जात आहेत, बाकींच्याबद्दल काय बोलणार. हे चित्र खूप धोकादायक आहे, लोकच साथ देणार नसतील तर सरकार तरी काय करणार, अशावेळी व्यवस्थापन तरी कुठे कुठे पुरणार?
इटली सारख्या देशात कमी तापमान हा या आजाराच्या उद्रेकाला कारणीभूत एक घटक असू शकतो. तो आपल्याकडे एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ऊन वाढत आहे, आपली इम्युनिटी चांगली आहे. पण स्वच्छता ही सर्वात कमकुवत बाजू आहे. आपली छोटीशी चूक भारतातील कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत होऊ शकते आणि याला उपाय म्हणजे फक्त शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळणे!
सरकार, नेते, अधिकारी लोक, पोलिस, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी… सर्वजण आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान सहन करत या विषाणूच्या विरोधात उभे आहेत. मग टीव्ही चॅनल्सनी सुद्धा थोडंसं टीआरपीचं नुकसान सहन करायला काय हरकत आहे… लोक घाबरतात तुमच्या चढ्या आवाजाला, अनाकलनीय ग्राफिक्सला आणि आकडेवारीला! तुमची सुत्रांकडून मिळालेली माहिती रूग्णांच्या मनात गैरसमज करते… ते उपचारांना घाबरतात, समाजाला भितात! आजघडीला एक पॉझिटिव्ह पेशंट पळून जाणे हे खूप मोठ्या आपत्तीचे कारण होऊ शकते.
येथील डॉक्टर जर हीरो असतील तर तेवढेच खरे हीरो हे उपचार घेणारे रूग्णसुद्धा आहेत. तुम्ही तुमच्यासोबत नकळत कितीतरी जणांचे प्राण वाचवणार आहात! उपचार घ्या… पळून जाऊ नका!
अधिकृत आकडेवारी
१) भारतभरातील विमानतळावर तपासलेल्या लोकांची संख्या १३,१९,३६३
२) भारतभरातील कन्फर्म रूग्णसंख्या १२५
३) महाराष्ट्रातील कन्फर्म रूग्णसंख्या ३९
४) भारतातील मृत्यू २
५) महाराष्ट्रात मृत्यू एकही नाही
६) उपचार घेऊन, बरे होऊन घरी परतलेले १३
(संदर्भ: website- Ministry of Health and Family Welfare)
डॉ प्रकाश कोयाडे (पुणे)