संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला सेना, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या उपस्थिती; फडणवीस राऊतांची गळाभेट चर्चेत..
X
महाविकास आघाडीचे सुत्रधार, शिवसेनेचे खासदार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिलेदार संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी राऊत हिचा काल ३१ जानेवारीला साखरपुडा पार पडला. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा संपन्न झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी पुर्वशीचं लग्न ठरलं आहे.
या सोहळ्याला राऊत परिवार तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीही उपस्थिती लावलेली पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित होत्या. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ही या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र पाहायला मिळालं.
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली.
संजय राऊत यांचे व्याही हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काम केलं आहे. तसंच त्यांनी २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम पाहिले होते.