रवींद्र महाजनी देखणा नट हरपला ,८ महिने एकटेच राहत होते ...
X
मराठीतील सर्वात देखणा नट म्हणून ओळख असलेल्या रवींद्र महाजनी यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुःखद झालाय. मुंबईच्या फौजदार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून शहरापासून गावापर्यंत प्रत्येकाच्या मनात एका देखण्या पुरुषाची भूमिका रुजवलेला अभिनेता म्हणजे रवींद्र महाजनी. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा मावळ तालुक्यातील आंबी येथे एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे.
मागील काही दिवसांपासून ते मावळ तालुक्यातील आंबी या ठिकाणी वास्तव्यास होते. सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहत होते अशी माहिती समोर आली आहे. तीन दिवस आधीच त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलंय. तरुणपणात हजारोंच्या गर्दीत वाढलेला जीव. मात्र हाच जीव जाताना एकटाच राहिला ...
रवींद्र महाजनी यांची चित्रपट सृष्टीतील पदार्पणाची कहाणी सुद्धा रंजक आहे. त्यांचे वडील एक स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार होते. रवींद्र महाजनी यांना शाळेत फारशी आवड नसताना वडिलांनी त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितले. रवींद्र महाजन 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे दिवसा चित्रपटसृष्टीतील लोकांना भेटणे आणि रात्री टॅक्सी चालवणे यातून वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांचा संघर्ष चालू झाला.
रवींद्र महाजनी यांनी झुंज या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि या चित्रनगरीत एक सितारा चमकायला सुरुवात झाली. रवींद्र महाजनी यांनी एकापाठोपाठ एक मराठी हिट चित्रपट दिले. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या चित्रपटाद्वारे १९७५ साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले "दुनिया करी सलाम", लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार या चित्रपटातील त्यांची स्वतःची वेगळी भूमिका त्यांनी मांडली आहे. मुंबईच्या फौजदारी चित्रपटातुन त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. रंजना देशमुख सोबत मुंबईचा फौजदार चित्रपटात रवींद्र महाजनी यांची भूमिका मराठी प्रेक्षकांना वेड लावून गेली. मराठी सोबतच गुजराती आणि हिंदी चित्रपटात सुद्धा रवींद्र महाजनी यांनी काम केले आहे. लाईट ,कॅमेरा ,ऍक्शन चं आयुष्य आजतागायत जगलेल्या नटाचा शेवट मात्र अंधारात झाला ... आणि संपूर्ण चित्रपट सृष्टी हळहळली ...