महिला बचतगटांना स्टॉल्सची प्रतीक्षा
दरवर्षी प्रमाणे लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी, अनारसे यासारखा दिवाळी फराळ तयार करून बचतगटाच्या महिला स्टॉलची प्रतीक्षा करत आहेत.
X
"दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही फराळ बनवला पण तो विकण्यासाठी आम्हाला स्टॉल मिळत नाहीय. सॉलच्या मागणिसाठी आम्ही रोज पालिकेला मागणी करतोय पण पालिका प्रशासन काहीच प्रतिसाद देत नाहीय.." ही प्रतिक्रीया आहे. सक्षम नारी महिला बचत गट अध्यक्ष स्वाती मोहिते यांची.
दिवाळी जवळ येताच तयार फराळाने बाजारपेठा सजतात. शहरातील महिला बचत गटासाठी उत्पन्नाची नामी संधी असलेल्या दिवाळी फराळाच्या विक्रीसाठी पालिका प्रशासनाकडून दरवर्षी चौकाचौकात स्टॉल उपलब्ध करून दिले जातात मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून बचत गटासाठी स्टॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला नसून प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र यामुळे दरवर्षी प्रमाणे लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी, अनारसे यासारखा दिवाळी फराळ तयार करून बचतगटाच्या महिला स्टॉलची प्रतीक्षा करत आहेत.
"आधीच आम्हाला कोरोनामुळे आर्थीक फटका आहे. त्यात पालिका प्रशासन स्टॉलसाठी परवानगी देत नाहीय. आता आम्ही या मालाचं काय करायचं? पालिकेनं परवानगी देवुन आमची दिवाळी चांगली करावी." अशी प्रतिक्रीया बचत गटाच्या सदस्य शिल्पा गूडडद यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात अनेक महिला बचतगटाकडून दिवाळीचा फराळ तयार करून त्याची विक्री केली जाते. यातून बचतगटाच्या महिलांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र यंदा करोना महामारीमुळे पालिका प्रशासनाकडून अनलोक बाबतचे निर्णय देखील टप्याटप्याने घेतले जात आहेत. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे बचतगटासाठी स्टॉल उभारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र बचत गटांनी मोठ्या प्रमाणावर फराळ तयार केला असून हा फराळ विकायचा कोठे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
फराळाचे पाकिंग तयार करत बचत गटाकडून स्टॉल मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले असले तरी स्टॉल उभारण्या बाबत वरिष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार किंवा नाहीत याबाबत अद्याप कोणतीही माहिती या बचत गटांना देण्यात आलेली नाही. यामुळेच दिवाळी सणापूर्वी हि परवानगी मिळणार का? तयार केलेला फराळ विकला जाणार का? यासारखे प्रश्न आर्थिक भार उचलत मेहनत करून स्वादिष्ट फराळ तयार केलेल्या बचत गटाच्या महिलांना पडला आहे.