सोन्याच्या भावात विक्रमी घसरण, गुंतवणूकीसाठी योग्य काळ?
सोन्याच्या दरांमध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहेत. सध्या भाव पुन्हा उतरले आहे. त्यामुळे आता सोन्यामध्ये गुंतवणुकीचा हा योग्य काळ आहे का? याचा शोध घेणारा संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट वाचा....
X
कोरोना काळात सोन्याच्या दराने 56 हजार प्रतितोळा ऐतिहासिक वाढीची उंची गाठली होती. आज त्याच सोन्याचा भाव प्रतितोळा 46,500 रुपये इतका झाला आहे. सहा महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये 9 ते 10 हजार इतकी घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात गेले सहा महिने चढ-उतार
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात प्रचंड चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या महिन्याभराचा विचार केला तर तीन हजार रुपयांनी सोन्याचे भाव तीन हजारांनी घसरले. सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर 47 हजारांपर्यंत खाली आले. तर मंगळवारी सकाळी सोने बाजार उघडताच पुन्हा 500 रुपयांची घसरण होऊन 46 हजार 500 रुपये प्रति तोळा भावाने सुरुवात झाली आहे. या भावात दिवसभरात चढ-उतार होऊ शकतो.
कोरोना काळात उच्चांकी भाव
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात जगभरात भीतीचे वातावरण असल्याने सोन्याचा भाव ऐतिहासिक उच्चांकावर म्हणजेच 56 हजार रुपये प्रतितोळा पोहोचला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने सोन्याच्या भावात घसरण होऊन जानेवारी महिन्यात 51 हजारांपर्यंत दर खाली पोहोचले. तर 1 फेब्रुवारीला दर एक हजारांनी पुन्हा खाली येत सोन्याचे भाव 50 हजारांवर पोहोचले. 1 मार्चला 47 हजार तर २ मार्चला तोच भाव GST धरून 46 हजार 500 रुपये इतका घसरला आहे.
सोन्याचे भाव घसरणीचे हे आहेत कारणे
संपूर्ण जग लॉकडाऊनमुळे ठप्प होते. आता जगभरात सर्व पूर्वपदावर येत असून संपूर्ण जगात कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अमेरिकेत सत्ता बदल झाल्याने तेथील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोने विक्रीला काढल्याचा परिमाण सोने व्यवहारावर झाला असल्याचं काही जाणकारांच मत आहे. आंतरराष्ट्रीय जगतात डॉलर्सचे दर तसेच आयात शुल्क कमी झाल्याचेही एक प्रमुख कारण मानलं जातं आहे.
सोने गुंतवणुकीसाठी चांगली संधी?
लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता सोनेभावात विक्रमी घसरण झाल्याने सोने खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. जास्त सोने खरेदी करण्याऐवजी आवश्यक तेवढीची सोने खरेदी करावी, भविष्यात आणखी भाव कमी होऊ शकतात असेही जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे. जागतिक पातळीवर सोन्याचे भाव कमालीचे खाली आले आहेत, सहा महिन्यात एवढे कमी भाव होतील हे वाटलं नव्हतं, पण आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे सोने गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कदाचित येणाऱ्या दिवाळीत हेच भाव 50 हजाराचा आकडा पुन्हा पार करु शकतात, असे सोने व्यापारी तसेच जाणकार संतोष खोंडे यांनी म्हटलं आहे.