Home > Max Woman Blog > स्त्री स्वातंत्र्याचा 'अमृता'नुभव कोणाला का खटकावा ?

स्त्री स्वातंत्र्याचा 'अमृता'नुभव कोणाला का खटकावा ?

स्त्री स्वातंत्र्याचा अमृतानुभव कोणाला का खटकावा ?
X


अमृता फडणवीस यांची लोकांनी यथेच्छ टिंगलटवाळी केलीय. त्यांची गाणी, त्यासाठी वापरलेला राजकीय दबाव यावरून त्यांना खूप ट्रोल केलं गेलंय. पण अमृता यांनी आपला छंद जोपासणं सोडलं नाही. आता त्यांचं नवीन गाणं आलंय. गाणं, संगीत, गायकी याहीपेक्षा महत्त्वाचं वाटतं समाजाची ठोकळेबाज बंधनं तोडून अमृता यांचं सादरीकरण.

अमृता फडणवीस यांचं गाणं अप्रतिम आहे का, त्यांच्याकडे गायन कौशल्य आहे का, त्यांचं सादरीकरण उत्तम आहे का, त्यांना अभिनय येतो का, त्यांच्याकडे नृत्य प्राविण्य आहे का या सगळ्या बाबी इथे गौण आहेत.

भारतीय राजकारणातल्या एका आघाडीच्या नेत्याच्या देवेंद्र यांच्या त्या पत्नी आहेत. फडणवीसांचा राजकीय पक्ष भाजपा सदानकदा तथाकथित संस्कृतीरक्षकाच्या भूमिकेत असतो. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली लोकांच्या दैनंदिन जीवनाचं नियमन करणं, त्यांना आपण सांगू तशाच प्रकारचे पेहराव करायला लावणं, विशिष्ट रंगांचेच कपडे घालायला लावणं, कोणी कसं वागावं, कसं वागू नये याचे मनमानी नियम लादणंआणि हे सगळं करत असताना समाजाला सतत झुंडगिरीच्या जोरावर धाकात ठेवणं अशा घटनांमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांची फूस असते हे आता लपून राहिलेलं नाही.

संघभाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद स्त्री स्वातंत्र्याचं दमन करणारा आहे ; त्यामुळे अमृता यांचे छंद स्वतः अमृता आणि देवेंद्र यांचीही मानसिक कोंडी करत असतील, ही शक्यता नाकारता येत नाही.

कदाचित देवेंद्र यांचा त्यांना मनापासून पाठिंबा असेल किंवा नसेलही ! कदाचित मनाविरुद्धही पाठिंबा द्यावा लागत असेल. जे असेल ते ; पण अमृता यांच्या जगण्यावर देवेंद्र फडणवीस यांचा अंकूश नाही, हे उघड दिसतं. उलट, अलिकडेच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय की अमृता जे करते, बोलते, ते तिच्या स्तरावरचं असतं, मी प्रत्येकवेळी तिच्याशी सहमत असेनच, असं नाही !

राजकीय धाकदपटशाच्या जोरावर अमृता यांचा गाण्याचा छंदही पूर्ण करायचा आणि त्यांना पारंपारिक वेषातच राहण्याची अट टाकून त्यांचा वापर राजकारणासाठी करायचा, असाही पर्याय फडणवीस यांच्याकडे होता. पण तसं झालेलं दिसत नाहीये. फडणवीसांचा राजकीय प्रभाव अमृता यांनी आपल्याला हवं तसं जगून घेण्यासाठी केलेला दिसतोय.

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बेबनाव असेल का, याबद्दलही कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. असूही शकतो, पण तो सार्वजनिक मंचावर अजिबात जाणवत नाही, हेही तितकंच खरं ! यात खरी कसोटी देवेंद्र यांची आहे.

फडणवीस ज्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगतात, ती पुरूषसत्ताक आहे. त्यात पुरूष तथाकथित 'मर्द' असणं आणि पत्नी त्याच्या 'मुठीत' असणं अपेक्षित आहे. संघीभाजपाई समर्थकांच्या समाजमाध्यमातल्या विविध विषयांवरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर स्त्रियांचा अनादर करणाऱ्या, त्यांना कस्पट समजणाऱ्या असतात.

जाळली, भाजली तरी स्त्रियांनी सीतेसारखं सोशीक असावं, असं मानणाऱ्या परंपरेचे हे कार्यकर्ते वाहक आहेत. ते दीपीका चिखालिया जराशी नाचली तरी सीतेच्या भूमिकेची आठवण करून देत दमटावतात. थोडक्यात, देवेंद्र आणि अमृता यांच्या भोवती हुल्लडबाज वानरांचा गराडा आहे. त्या गराड्यात अमृता फडणवीस स्वतःला हवा तसा पेहराव करून गाणं गातात, नाचतात, अभिनय करतात !

त्यांचं 'दिसणं' तथाकथित 'भारतीय' नाही, तरीही त्यांना 'आहे तसं' संघीभाजपाई कार्यकर्ते, नेते, समर्थकांना स्वीकारावं लागतं. यात फडणवीस यांची नेतेगिरी नव्हें तर अमृता यांची दबंगगिरीच अधिक कारणीभूत असावी, असं प्रथमदर्शनी तरी दिसतं.

वास्तविक, एका परीने अमृता फडणवीसांचा 'मुक्तपणा' देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणासाठी नुकसानदायक आहे. संघीभाजपाईंसाठी सत्तास्वार्थी राजकारण जीव की प्राण आहे ; शिवाय ते सनातनी आहे. स्त्रियांना पुन्हा एकदा संस्कारांच्या आडून चुलीतमुलीत ढकलू पाहणारं आहे. पण ते राजकारण अमृता फडणवीस यांना वेसण घालू शकलेलं नाही.

समाजमाध्यमात संघभाजपाचा विखारी किल्ला लढवणाऱ्या शेफाली वैद्य यांनीही अमृता फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. अमृता यांनी त्यांना उडवून लावलं होतं.

अमृता यांचं गाण्यांच्या शूटींगमध्ये मुक्त वावरणं, अदाकारी करणं, हावभाव देणं, मुरडणं वगैरे इतकं सोपं नसतं जितकं आपण समजतो. त्यांचे गाण्यांचे अल्बम भले राजकीय पाठबळावर निघत असतील, पण मूळात त्यातील सहभागासाठीच्या मानसिक तयारीसाठी राजकीय पार्श्वभूमी एक प्रतिकूल घटक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

त्यातही तुम्ही बड्या राजकीय नेत्याच्या आणि त्यातही संस्कृतीच्या बाता मारणाऱ्या भाजपासारख्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पत्नी असाल तर किती म्हटलं तरी मेंदूत तो दबाव असतोच. अमृता तो झुगारून देताना दिसतात. अमृता यांच्या ग्लॅमरस झगमगाटात तथाकथित संस्कृतीरक्षकांची केविलवाणी हतबलता अगदी स्पष्ट दिसते. या द्वेषभक्तांचं घरातल्या घरातच थोबाड फोडण्यासाठी तरी त्यांचं कौतुक करायलाच हवं.

मात्र हे स्वातंत्र्य अमृता यांनी स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नये. संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांना नमवू पाहणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही खडे बोल सुनवावेत. कपड्यांवरून स्त्रियांना थोबडवू पाहणाऱ्या नेत्यांनाही अमृता यांनी आवर घालायला हवा. स्वतःला मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं असेल तर स्त्रियांना गुलामीत ठेवू पाहणारं 'बाईपण' झिडकारण्यासाठी अमृता यांनी मोहिम राबवावी.

राज असरोंडकर

लेखक सामाजिक राजकीय अभ्यासक व विश्लेषक तसंच कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मीडिया भारत न्यूज वेब पोर्टलचे संपादक आहेत.

Updated : 10 Jan 2023 3:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top