विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतर्फे आपला राज्यसभेचा अर्ज दाखल केला. भाजपा पक्षातर्फे छत्रपती उदयनराजे राजे भोसले आणि रामदास आठवले यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना पक्षातर्फे प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
- राज्यसभेत शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी; खैरे, रावतेंना डच्चू
- प्रियांका चतुर्वेदींच्या निवडीमुळे शिवसेनेला घरचा आहेर
महाराष्ट्रास अनादिकाळापासून बुद्धिमान, कर्तृत्ववान महिलांची श्रेष्ठ, गौरवास्पद परंपरा लाभली आहे. परंतु आज देश पातळीवर अनेक सक्षम महिला असून देखील अपवादानेच महिला लोकप्रतिनिधी आढळतात. या पार्श्वभूमीवर एका सक्षम व अभ्यासू, युवा वगाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी सारख्या चेहऱ्यास राज्यसभेवर पाठविण्याच्या कौतुकास्पद निर्णयाचे सर्व स्तरांमधुन स्वागत होत आहे.
प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) हे नाव महाराष्ट्रास नवीन नाही. गत अनेक वर्षे त्या समाज कार्यात सक्रीय असून महिला सक्षमीकरणासाठी सर्वांगिण प्रयत्न करणाऱ्या , विशेषत: तळागाळातील महिलांना त्यांच्या स्वत्वाची जाणीव करुन देऊन त्यांना आर्थिक आघाडीवर स्वावलंबी करण्यास मदतीचा हात देणाऱ्या अनेक संघटनात त्या संचालिका आहेत. शिक्षण क्षेत्र, महिलांना सशक्त बनविण्याचे उपक्रम अशा अनेक सामाजिक कार्यात चतुर्वेदी यांचा मोलाचा वाटा असतो.
२०१५ वर्षी प्रियांका चतुर्वेदी यू. के. हाय कमिशनने निवडलेल्या युवा राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळात आणि कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन लंडनमध्येही त्या सहभागी होत्या व त्यातील प्रभावी प्रतिनिधीत्वाद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटविला होता. २०१६ मध्ये निवडण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या १० उदयोन्मुख महिला राजकारण्यांच्या यादीत त्यांचा समावेश होता, हे उल्लेखनीय!
प्रियांका चतुर्वेदी यांचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि ओघवती लेखन शैली. त्यामुळे आज त्या देशातील आघाडीच्या ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात. शिवसेना (Shivsena) पक्षाची बाजु इंग्रजी माध्यमांद्वारे तसेच समाजमाध्यमांवर परखडपणे मांडणे ही त्यांची पक्षातील एक अजुन जमेची बाजु. आज राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षाची बाजू देशभरात मांडण्यात त्यांनी प्रमुख भुमीका निभावलेली आहे.
आज केंद्रात राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याच्या बाबतीत महिलांची व युवा वर्गाची संख्या फार कमी प्रमाणात आहे. हाच धागा पकडून शिवसेना पक्षाने त्यांना राज्यसभेवर संधी दिलेली आहे. त्यांच्या राजकीय अभ्यासू वृत्तीचा नक्कीच शिवसेना पक्षाला भविष्यात फायदा झालेला दिसून येईल असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.