बँक चोरांना ६८,००० करोड माफ; PM Cares फंडाचा हिशोब व्हायलाच हवा

Update: 2020-05-02 17:33 GMT

देशात कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकार पीएम केअर (PM Cares) फंडच्या माध्यामातून मदतीची मागणी करत आहे. एकीकडे उत्तर प्रदेश च्या भदोही जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेतू एप डाऊनलोड करुन देतानाही १००- १०० रुपये पीएम केअर फंडाच्या नावावर घेतले जात आहेत. आणि दुसरीकडे देशातून पळालेल्या बँक चोरांना ६८,००० करोड माफ होतात. अशावेळी पीएम केअर फंडाचीही सरकारी ऑडीट का होऊ नये? असा सवाल कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उपस्थित केला आहे.

उत्तरप्रदेश मधील भदोली जिल्ह्यात कोरोना महामारीपासून सुरक्षिततेसाठी नागरिकांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू (Aarogya Setu) एप डाऊनलोड करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या आदेशपत्रात अधिकाऱ्यांनी नागरिकांना एप डाऊनलोड करून द्यावेत आणि पीएम केअर साठी शंभर रुपये घ्यावेत असे सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीएम केअर फंड वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. देशातील सर्व सरकारी पैशांचा हिशोब ठेवण्याचं काम CAG अर्थात भारताचे महालेखापरिक्षक करत असतात. मात्र, जे खाते देशाच्या महालेखापरीक्षकाच्या अखत्यारीतच येत नाही. ते खाते देशाच्या घटनात्मक चौकटीतच बसत नाही. अशा खात्याला देशातील जनतेने दिलेला पैसा योग्य हातात जात आहे का? असा वाद निर्माण झाला झाला आहे.

सरकार सर्वसामान्य जनतेकडून मदतनिधीमधून पैसे घेत असेल तर सरकारने त्या पैशांचा हिशोब देणे आवश्यक असल्याची भुमिका प्रियांका गांधी यांनी घेतली आहे. सामान्य जनतेच्या पैशाचं सरकारी ऑडिट व्हायला हवं. देशातून पळालेल्या बँक चोरांना ६८,००० करोड माफ झाले त्याचा हिशोबही व्हायला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.