राज्यसभेत शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी; खैरे, रावतेंना डच्चू
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रियांका चतुर्वेदी यांची एकमेव उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात आश्चर्याचा धक्का बसला आहे. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उमेदवारीची अधिक चर्चा होती. मात्र, या दोन्हीही ज्येष्ठ नेत्यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर विस्वास दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फौजिया खान यांच्यानंतर प्रियांका यांची महिला उमेदवार म्हणून वर्णी लागली आहे.
राज्यसभेसाठी ७ उमेदवारांच्या लढतीत भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एक उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. २६ मार्चला राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रियांका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय असून युवा सेनेत मोठ्या प्रमाणात सक्रीय होत्या आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी मोलाची ठरली होती.
प्रियांका यांनी काँग्रेस पक्षात असतानाही प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडताना उत्तम कामगिरी बजावली होती. राहुल गांधी यांच्या अधिपत्याखालील युवक काँग्रेसच्या सरचीटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्यांनी आपला राजीनामा राहुल गाधीकडे सुपुर्त केला होता.
-महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार
उदयनराजे भोसले – भाजप
भागवत कराड – भाजप
रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
शरद पवार – राष्ट्रवादी
फौजिया खान – राष्ट्रवादी
प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
राजीव सातव – काँग्रेस (अधिकृत घोषणा बाकी)