'खासदार प्रज्ञा ठाकूर हरवल्या आहेत' अशी पोस्टरबाजी मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरातील काही भागांमध्ये करण्यात आलीय. कोरोनाच्या संकटात त्या आपल्या मतदारसंघातील जनतेसमोर एकदाही आल्या नाहीत म्हणून हा अशाप्रकारे पोस्टरबाजी सर्व शहरात केली जात आहे.
पोस्टरमध्ये लिहलंय की, ‘कोरोना महामारीमुळे भोपाळची जनता त्रस्त आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर कुठे हरवल्या’. या पोस्टरबाजी सोबतच मध्यप्रदेश मधील राजकीय वादांनाही तोंड फुटलंय. कॉंग्रेसने या संधीचा फायदा घेत भाजपवर आणि प्रज्ञा ठाकूर (Pradnya Thakur) यांच्यावर निशाणा साधलाय. कॉंग्रेस नेता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) निवडणुकीत पराभूत होऊनही कोरोनाच्या संकटात काम करत आहेत आणि खासदार प्रज्ञा ठाकूर गायब आहेत असं कॉंग्रेस नेता पीसी शर्मा यांनी म्हटलं आहे.
शहरात पोस्टरबाजीच्या प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर भाजप कार्यकर्ते प्रज्ञा ठाकूर यांच्या समर्थनार्थ उतरले. पोस्टर लावणाऱ्या अज्ञात इसमांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समर्थकांनी म्हटलंय की, कोरोना महामारीच्या संकटात प्रज्ञा ठाकूर यांनी जनतेसाठी २ करोडचा मत निधी दिला आहे.
या पोस्टरबाजी प्रकरणावर पडदा टाकताना प्रज्ञा ठाकूर यांनी स्वत: एका व्हिडीओच्या माध्यामातून जनतेला त्यांच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलं आहे. व्हिडीओत त्यांनी म्हटलंय की, “माझी प्रकृती स्थिर नसून माझा एक डोळा निकामी झाला आहे. तर दिसऱ्या डोळ्याचीही २५% दृष्टी आहे. डॉक्टरांनी मला जास्त बोलण्यास मनाई केली आहे. पण, माझी प्रकृती स्थिर नसताना कॉंग्रेसने फारचं वाईट पद्धतीने राजकारण केलं आहे.”
भाजपचे प्रदेश प्रवक्ता राहुल कोठारी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधताना म्हटलंय की, प्रज्ञा ठाकूर दिल्लीच्या AIMS रुग्णालायात कॅंसर आणि डोळ्यांवर उपचार घेत असल्याचं कोठारी यांनी स्पष्ट केलं आहे. भोपालमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी सर्व कार्य चालू असून दिग्विजयसिंह लोकांमध्ये आपली उपस्थिती दाखवून फक्त राजकारण करत आहेत.