पंकजा मुंडे म्हणतात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीत ‘हे’ आहे अंतर
महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना व्हायरस च्या संकटावर मात करण्यासाठी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कार्यशैलीला पाठींबा देताना दिसत आहेत. कोरोना महामारीची परिस्थितीत त्यांनी ज्या पद्धतीने हाताळली त्याविषयी त्यांचं कौतुकही होत आहे. अशात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
"महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देईन. ते परिस्थिती व्यवस्थित हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका-टिप्पणी करण्यापेक्षा सूचना करणं हे आता माझं कर्तव्य आहे." असं भावना पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचं अभिनंदन करताना दिली.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राहणीमानाविषयीही आवर्जुन वक्तव्य केलं आहे. "मुख्यमंत्री कसा असावा, त्याने कपडे कसे परिधान करावे, त्याची बॉडी लँग्वेज काय असावी, त्याने किती व्यक्त व्हावं, त्यांनी सतत दिसावं याविषयी लोकांच्या कल्पना असतात. त्याच्यापेक्षा ते थोडे वेगळे दिसतायत हे मात्र नक्की. त्यांचा पेहराव किंवा ते सोशल मीडियावर स्वतः फार अॅक्टिव्ह नाहीत, पण CMO अॅक्टिव्ह आहे.
सोबतच त्यांच्या कार्यशैलीची तुलना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी करताना “देवेंद्र फडणवीस स्वतः सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्वीट करायचे. पण उद्वव ठाकरेंचा कल वेगळा दिसतोय. मला वाटतं ते एक नवीन पायंडा पाडू शकतात. मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन कारण लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची चांगलं काम करावं असं मला वाटतं." अशा शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी उसतोड कामागारांच्या पोटापोण्याचा प्रश्न उपस्थित करताना सरकारने संबंधित परिस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. “ऊसतोड कामगार वा जे कामगार आज रस्त्यांवर आहेत, हे आपल्यासाठी मोठं आव्हानन ठरू शकतं. दिल्लीत जो प्रकार घडला तसं महाराष्ट्रात घडू नये याची खबरदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर जे लोक आता स्वतःच्या घरापासून वंचित आहेत ते थोडेसे आक्रमक होण्याची शक्यता असू शकते.” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
याविषयी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्र व्यवहार केला असून त्यांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं.