"'या' हरामखोरांवर जोर दाखवा", चित्रा वाघ यांचं जितेंद्र आव्हाडांना चेलेंज
राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये उपचार देणाऱ्या नर्सेस समोर विकृत अश्लील चाळे करणाऱ्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा, अशी टीका करत संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
अरे बाप रे अमानवीय ,सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा हॉस्पिटल मध्ये उपचार देणार्या नर्सेस समोर विकृत अश्लील चाळे करणार्या हरामखोरांवर तुमचा ज़ोर दाखवा @Awhadspeaks @ThaneCityPolice संबंधीतांवर कारवाई व्हावी @DGPMaharashtra @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks https://t.co/6EINjoRXag
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 7, 2020
कासारवडवली येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव अनंत करमुसे आहे. वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात अनोळखी व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना रविवारी रात्री फेसबुक आणि ट्विटरवर केलेल्या पोस्टचा राग आल्याने त्यांच्या सांगण्यावरून मला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते असं या तरुणाचं म्हणणं आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे आणि मेणबत्ती लावण्याचं आवाहन जनतेला केलं होत.यावर जितेंद्र आव्हाड यांनी आपला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, यानंतर पंतप्रधानांच्या आव्हानाला नागरिकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून त्या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फेसबुक आणि ट्वीटर पोस्ट लिहली होती. या पोस्टसह जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्रही त्याने जोडलं होत.
रात्री तरुणाच्या घरी दोन पोलिस आले आणि पोलिस ठाण्यात नेतो असं सांगून थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेण्यात आलं. तिथे कार्यकर्तांनी बेदम मारहाण करुन माफी मागण्यास भाग पाडले. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पोस्ट का केली य़ाविषयी विचारणा केली. आणि ती पोस्ट डिलीट करण्यास सांगितले.
यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना बोलावून या तरुणाला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.