करमाळा येथील न्यायालय परिसरात एका कडब्याच्या ट्रकला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळी ही आग लागली. ही आग एवढी मोठी होती की, काही वेळातच ट्र्क पूर्ण जळून राख झाला आहे. आगीची माहिती समजताच करमाळा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अशी माहिती नगरपालिकेचे दिगंबर देशमुख यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवला आहे. करमाळा न्यायालय परिसरात संध्याकाळी कॉटेजकडून कडबा घेऊन हा ट्रक आला होता. दरम्यान वीज वाहिनीच्या तारेला ट्रक लागल्याने ही आग लागली. आग लागल्यानंतर ट्रकचालकाने प्रसंगावधान बाळगल्याने अनर्थ टळला. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते म्हणाले, या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. येथून सतत जड वाहतूक सुरु असते. महावितरणने याकडे लक्ष देऊन विद्युत वाहिन्या वर घेण्याची गरज आहे.
या ट्रकला आग लागल्यानंतर धुराचे लोट पसरले होते. दरम्यान बघ्यांचीही मोठी गर्दी होती. आग लागलेला ट्रक नगर जिल्ह्यातील चापडगाव येथील असल्याचे समजत आहे. आता ही आग पुर्णपणे विझली आहे. परंतू ही आग विझवण्याकरीता नगरपालिकेसह कारखान्याच्याही अग्निशमन विभागाच्या गाडया बोलवण्यात आल्या होत्या. आग मोठी असल्याने आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.