नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रितम मुंडे पोहचल्या बांधावर
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजप नेत्या आणि बीडच्या खासदार प्रितम मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
प्रितम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात पाहणी केली. यावेळी शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी महिला शेतकऱ्यांशी सुद्धा चर्चा करत,झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
तर, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली आहेत, शेतजमीन वाहून गेल्या आहेत. जवळपास संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे, तरीही शेतकरी बांधव या संकटाचा धीरोदात्तपणे सामना करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मी करणार असल्याचं यावेळी प्रितम मुंडे म्हणाल्यात. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी अन्नदात्या बळीराजाला बळ द्यायचे असेल तर शासनाने देखील सरसकट मदत जाहीर करणे अपेक्षीत असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या.