अंगणवाडी सेविकांनी काढली मोबाईलची अंत्ययात्रा
गणवाडी सेविकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी शासनाने दिलेले मोबईल निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडी सेविकांनी या मोबाईलची अंत्ययात्रा काढली आहे.;
वर्धा // राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना सर्व कामे ऑनलाईन व्हावीत म्हणून मोबाईल देण्यात आले होते. हे मोबाईल अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सातत्याने बंद पडत असल्यामुळे अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. मोबाईल सातत्याने खराब होत असल्याने कामावर त्याचा परिणाम होतो. सोबतच त्याच्या दुरुस्तीचा खर्चही अंगणवाडी सेविकांनाच करावा लागतो. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात मोबाईलची अंत्ययात्रा काढली आहे.
अंगणवाडी सेविकांचा तुटपुंजा पगार त्यातही मोबाईलचा खर्च. यामुळे अंगणवाडी सेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयटकचे कामगार नेते दिलीप फुटाणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद समोर या मोबाईलची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे सर्व मोबाईल शासनाला परत करणार असल्याची माहिती कामगार नेते दिलीप फुटाणे यांनी यावेळी दिली.
दरम्यान यावेळी आंदोलक अंगणवाडी सेविकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाने वर्धा जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती. आता शासन-प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे.