नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीबरोबर देशभर महिलांचे आंदोलन सुरू आहे. या सर्व घटनांनमध्ये वेळोवेळी पाकिस्तानचं नाव देखील गोवलं जात होतं. काहीही असले तरी पाकिस्तानी जनतेचे हाल आणि छळ संपता संपणार नाही, हे खरे आहे. जगभरात आतंरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचे मोर्चे आपला आवाज बुलंद करत असतात. पाकिस्तानमध्ये देखील आतंरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोर्चा काढला होता. औरत मार्च !! महिला मोर्चाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यावर्षीच्या मोर्चाची थीम होती "मेरा जिस्म, मेरी मर्ज़ी"
पाकिस्तानमध्ये ८ मार्च महिला दिनानिमित्त दरवर्षी असे मोर्चे काढत इथल्या मुस्लीम कट्टरवाद्यांच्या विरूद्ध आपला आवाज बुलंद करतात. मात्र यावर्षीचा महिला दिनानिमित्त झालेला मोर्चा वेगळा ठरला. पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरवाद्यांच्या धमकीला झुगारून देत तेथील महिलांनी आझादी मोर्चा काढला. मात्र या मोर्चाला वेगळंच रूप आलं. महिलांचा हा मोर्चा शांततेत सुरू असताना राजधानी इस्लामाबादमध्ये मुस्लीम कट्टरवाद्यांनी वीट आणि चप्पलांनी हल्ला केला. पाकिस्तानी महिलांचा हा लढा स्वतःच्या अधिकारांसाठी आहे.
पाकिस्तानमध्ये महिलांना घरगुती हिंसाचार, बलात्कार, लैंगिक शोषण आणि बळजबरीने विवाह इत्यादी गुन्ह्यांना सामोरं जावं लागतं. याविरूद्ध महिलांनी देशभरात निदर्शने केली. या मोर्चाला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. मात्र राजधानी इस्लामाबादमध्ये शांततेत निघालेल्या या मोर्चावर मुस्लिम कट्टरपंथियांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक महिला जखमी झाल्या.
जमियत-ए-उलेमा-ए-इस्लाम फजल या संघटनेचा नेता मौलाना फजल-उर-रहमानने या महिलांना धमकी दिली होती. महिलांचा हा आझादी मार्च कोणत्याही परिस्थितीत आपण रोखणार असल्याचे त्याने सांगितले. "मेरा जिस्म, मेरी मर्ज़ी", "औरत की सही जगह चादर और चार दीवारी में है". "मेरा शरीर, मेरी पसंद!" , "मेरा शरीर, आपके लिए युद्ध का मैदान नहीं है!", “मासिक धर्म को लेकर डरना बंद करो!” अशा घोषणा देत मोर्चा या महिलांनी काढला.
इस्लामाबादमध्ये निघालेला महिलांचा मोर्चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असल्याचं बोलंलं जात आहे. महिलांचा आझादी मार्च हा 'इस्लाम'च्या तत्वांविरोधात आहे. अश्लीलता आणि द्वेष पसरवणे हा या मोर्चाचा छुपा अजेंडा आहे असं मुस्लीम कट्टरवाद्यांकडून पसरवण्यात आलं आहे. पाकिस्तानातील महिलांची स्थिती अत्यंत विदारक आहे. पाकिस्तानातील धार्मिक कट्टरवादी घटक महिलांची प्रगती होऊ देऊ इच्छित नाहीत.
पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पाकिस्तानात प्रतिष्ठेच्या नावाखाली दर वर्षी सुमारे १००० महिलांची हत्या केली जाते. याची अधिकृत माहिती बीबीसी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तेजस बोरघरे