विलनची भूमिका साकारणारे राहुल देव मुलाच्या आयुष्यातले रियल हिरो
निसर्गाने स्त्रीला माया -ममता प्रेम यात इतकं निपुण केलं केलंय की आईची जागा पिता घेऊच शकत नाही. मात्र, पत्नीच्या निधनानंतर मुलगा सिद्धांतची जबाबदारी, संगोपनसाठी करिअरला थांबा देणारे, सिंगल पॅरेंट्स अभिनेते राहूल देव यांची पूजा सामंत यांनी फादर्स डे निमित्त घेतलेली मुलाखत नक्की वाचा
आम्ही मूळचे दिल्लीचे. वडील पोलीस ऑफिसर तर आई प्रिन्सिपल. मध्यम वर्गीय मुलांमध्ये आम्ही भावंडं वाढलो. पुढे मी रिनाच्या प्रेमात पडलो, त्यावेळेस मी जेमतेम १८ वर्षांचा आणि रीना १९ ची होती. माझ्यापेक्षा १ वर्षांनी मोठी होती. रीनामध्ये उपजतच परिपक्वता,जबाबदारीची जाणीव, ममता होती.
आमचा संसार तिने अतिशय निगुतीने सांभाळला, माझं मॉडेलिंग करियर हळहळू आकाराला येत होतं. रिनाने सिद्धांतला जन्म दिला आणि आयुष्यातला आनंद कित्येक पटींनी द्विगुणित झाला. सिद्धांतला पिता म्हणून फारसा वेळ देणे. त्या काळात शक्य नव्हते. कारण मी झपाटल्यासारखा काम करत होतो. रिनाने सिद्धांतला त्याच्या आवडीचे वैविध्यपूर्ण पंजाबी पदार्थ स्वतः करून त्याला खाऊ घालत असे. त्याचा अभ्यास घेणे, त्याच्या शाळेत जाणे एकूणच घरोघरी आई आपल्या मुलांसाठी जे काही ममतेने, हौसेने करते ते सगळंच रिनाने केलं..
आमच्या सुखी आनंदी कुटुंबात मीठाचा खडा पडला ! २००७-८ मध्ये तिचं कॅन्सरचं निदान झालं आणि १६ मे २००९ रोजी रीनाचं निधन झालं! सगळंच अविश्वसनीय-अकल्पित! असंभव! मेंदू सुन्न करून गेली रीना!
सिद्धांताने १० वर्षे पूर्ण केली होती आणि त्याच्या त्या १० वर्षांमध्ये त्याचं आणि रीनाचं एक वेगळंच विश्व निर्माण झालं होतं, ह्या माय-लेकरांच्या कोशात मी देखील कधी शिरू शकलो नव्हतो! त्यांच्या गप्पा -त्यांचा गृहपाठ - त्यांच्या स्पर्धांची तयारी, त्यांचं शॉपिंग ह्याचा मला काहीच थांग नसे.
माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थेर्य द्यावं म्हणून मी कामात स्वतःला झोकून दिलं होतं! पण, रिनाच्या तशा अचानक एक्झिटने कुटुंबाला, मला सुरुंग लावलाच होता. परंतु सिद्धांतच्या भावविश्वाला इतके तडे गेलेत की, आईविना मी आमच्या सिद्धांतची कल्पनाच करू शकत नव्हतो!
तिच्यानंतर कोसळलेली आर्थिक गणितं सांभाळू, सिद्धांतला कसं आवरावं, मी पुढे काय करावं असंख्य प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभे होते. कुठल्याही प्रश्नांची उकल होणारी नव्हती.. सिद्धांतच्या शाळेत त्याचं ओपन हाऊस अटेंड करण्यासाठी मी शाळेत प्रथम गेलो आणि त्यानंतर त्याचं शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत जात राहिलो. पण समस्त पालकांमध्ये फक्त मी एकमेव पुरुष होतो हे जाणवलं...! नंतर हे अवघडलेपण राहिलं नाही. सिद्धांतची आई आणि वडील आता कायमच मी झालो होतो.. सिद्धांतचा एकटेपणा, त्याच्या मनात निर्माण झालेली पोकळी कमी व्हावी म्हणून मी माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईला रामराम ठोकला आणि सिद्धांतला घेऊन दिल्लीत, माझ्या आई-वडिलांकडे शिफ्ट झालो!
४-५ वर्षे मी माझे बॉलिवूड -मॉडेलिंग गुंडाळून ठेवले, कारण शूटिंग किंवा मॉडेलिंग हे व्यवसाय सिद्धांतच अभ्यास, होमवर्क आणि त्याला द्यावा लागणार मौलिक वेळ सांभाळून करता येण्यासारखा नव्हता! ह्या व्यवसायात आऊट ऑफ साईट इज आऊट ऑफ माईंड असते. हे माहित असूनही मी दिल्लीत शिफ्ट झालो.
पोटापाण्याचा व्यवसाय सुरु करावा, म्हणून ६ जिम्स सुरु केल्यात, ८४ कर्मचारी वर्ग माझा होता जिमसाठी.. त्यात बरेचसे पैसे खर्च झालेत, पण सिद्धांतबद्दलच्या अनेक इन्सिक्युरिटीज माझ्या मनात कायम असत, मला लेकाबद्दल वाटणारी धास्ती, दडपण, भीती, चिंता रिनाला कधीच पडल्या नसतील का?
तिच्या जागी मी स्वतःला पाहू लागलो होतो! रीना त्याला लच्छेदार पराठे करून देत असे ती सिद्धांतची विशेष आवड होती. ह्या बाबतीत मी मात्र कमी पडलो! मी ह्या जिमच्या व्यवसायाला नफ्यात आणण्यास असमर्थ ठरलो! सिद्धांतचे पालनपोषण करण्याच्या त्या काळात माझ्या मनावर इतका ताण असे! तो शाळेतून वेळेवर घरी येईल का? अभ्यास त्याला झेपतोय ना? त्याच्या मित्रांची संगत योग्य आहे ना!
अशा एक ना अनेक चिंतांनी मी धास्तावला असे! लवकरच सिद्धांताने वयाची १३ वर्षे पूर्ण केलीत आणि तो पौंगडावस्थेत गेला. अभ्यासाखेरीज त्यांने इंटरनेट अधिक वापरू नये म्हणून मी दक्ष असे. त्याच्या आजीशी (माझी आई) त्याचे छान मेतकूट जमले असले तरी तो रिनाला विसरला नव्हता!
सिद्धांतला चांगले गुण पडत होते, पण त्याने स्पोर्ट्समध्ये लक्ष घालावे, वाचनात रस घ्यावा. अशी तळमळ होती माझी, पण त्याने त्या काळात रस घेतला नाही. पण तरीही माझ्या महत्वाकांक्षा त्याच्यावर लादल्या नाहीत की त्याचं कधी चुकलं माकलं तरी मी त्याच्यावर कधी रागावलो नाही, स्ट्रिकट फादर मी कधीही झालो नाही..
निसर्गाने स्त्रीला माया -ममता प्रेम यात इतकं निपुण केलं केलंय की आईची जागा पिता घेऊन शकत नाही! त्याने नववी उत्तीर्ण केल्यावर युकेच्या मोठ्या शाळेत मी त्याला प्रवेश घेऊन दिला. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो कधीही अकेडमिक्समध्ये कमी आहे अशी त्याची भावना होऊ नये. युकेच्या शालेय नियमानुसार विद्यार्थ्याला विचारूनच त्याचे मार्क्स-त्याच्या पालकांना कळवण्यात येते! मी मात्र, त्यांना विनंती केली की मीच त्याचा एकमेव पालक आहे. तेव्हा त्याचे मार्क्स, त्याची प्रगती -वर्तन मला कळवण्यात यावेत! सिद्धांतचा मला फोन येणार म्हणून मी इथे मुंबईत जागत बसे, कारण युके आणि आपला देश दोन्हीकडचे टाइम झोन वेगळे आहेत. सिद्धांतला शिक्षणासाठी युकेला पाठवल्यावर मी हळहळू माझे बस्तान पुन्हा मुंबईला बसवले!
रिनाच्या पश्चात मी पुनर्विवाहाचा कधीही विचार केला नाही, तो विचारच माझ्या मनाला कधी शिवला नाही! सिद्धांतला मोठं करण्यात मी कसूर केला नाही!
पुन्हा अभिनयाची घडी बसवण्यास काही वर्षे लागलीत. काही पंजाबी, काही प्रादेशिक, ३-४ वेब सिरीज, आणि १२२ हिंदी फिल्म्स मी केल्यात. पण ह्या कारकिर्दीपेक्षा पिता म्हणून समाधान अधिक महत्वाचे होते! माझा आणि रीनाचा वेळ, कर्त्यव्य यात मी कमी पडलो नाही हीच काय ती जमेची बाब! माझं आणि सिद्धान्तच नातं टिपिकल पिता -पुत्राचं नाही, पण अतिशय घट्ट आहे!
पूजा सामंत