टुम्पा भेटली आणि काली घाटमधल्या कालीमातेचा शोध संपला

टुम्पा! तिचा दोष इतकाच होता की, ती एका देहविक्री करणाऱ्या बाईच्या पोटी जन्माला आली. तिच्या बापाला तिला धंद्याला लावायचे होते. मात्र, टुम्पाने आपल्या बापाला जेलमध्ये टाकत... देहविक्री करणाऱ्या महिलांची बाप झाली वाचा... नवरात्र विशेष समीर गायकवाड यांचा लेख;

Update: 2020-10-23 23:00 GMT

52005 चं साल होतं. जुलै महिन्याचा धुंवादार पाऊस कोसळत होता. सगळीकडे मेघांची दाटी होऊन अंधारून आलं होतं. कोलकत्यातील हलदर पाडा रोडवरील कालीघाट पोलीस स्टेशनमध्ये पावसामुळे वर्दळ रोडावली होती. दुपार सरून संध्याकाळ यायच्या बेतात होती. पोलीस स्टेशनमधलं वातावरण आळसावून गेलं होतं. साऱ्या आसमंतात एक जडत्व आलं होतं. पोलीस नाईक स्टेशन डायरी तपासत होते. तितक्यात त्यांच्या समोर चिंब भिजलेली अपुऱ्या कपड्यातली षोडशवर्षीय तरुणी धावत येऊन धापा टाकत रडू लागली. तिच्या नाकातून रक्त येत होतं आणि गालावर मारल्याचे लालनिळे वळ होते. ओलेते केस पार विस्कटलेले होते. तिची मॅक्सी खांद्याजवळ किंचित फाटली होती. पोलिसांनी गांभीर्य ओळखत तिला आधी शांत केलं, धीर दिला आणि तिचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. तिची तक्रार ऐकताच ते थिजून गेले.

आपल्या जन्मदात्या वडिलांविरुद्ध ती तक्रार द्यायला आली होती. तिचा दोष इतकाच होता की, ती एका वेश्येच्या पोटी जन्माला आली होती. तिच्या बापाला तिला धंद्याला लावायचे होते आणि वेश्या असलेल्या तिच्या आईचा याला तीव्र विरोध होता. या गोष्टीवरून त्यांच्या त्या छोटेखानी खोलीवजा घरात रोज मारझोड व्हायची. तिचा बाप दारू पिऊन यायचा आणि तिच्या आईला गुरासारखी मारहाण करायचा. नंतर नंतर त्यानं आपल्या मुलीवरही हात उचलायला सुरुवात केली. त्याचा अत्याचार त्या मायलेकी मुकाट सहन करत राहिल्या. ती माऊली तशाही काळात आपल्या मुलीने शिकत राहावं यासाठी झटत राहिली.

मात्र, त्या दिवशी आक्रीत झालं. कॉलेजची पहिल्या वर्षीची फी भरण्यासाठीची रक्कम तिच्या आईने कशीबशी गोळा केली होती. मात्र, तिच्या बापाने ती रक्कम परस्पर चोरून नेली आणि त्या पैशाची दारू ढोसून चैन केली. आपल्या बापाने आपली फी उडवून टाकली याचा तिला मनस्वी संताप आला. तिने बापाशी वाद घातला. त्यावर त्यानं तिलाच झोडून काढलं. या खेपेस तिची सहनशक्ती संपली आणि तिनं निर्धार केंला की याचा अत्याचार आता अधिक सहन करायचा नाही.

तिने भर पावसात पोलीस स्टेशन गाठलं. तिची कैफियत ऐकून पोलिसांनी त्वरित कारवाई केली. तिच्या बापाला जेरबंद करून त्याला यथेच्छ कुटून काढलं. त्या दिवसापासून त्या मुलीचं आयुष्य बदलून गेलं. तिचं नाव टुम्पा अधिकारी. ही तिचीच यशोगाथा.


टुम्पाची आई वेश्या होती, मात्र, ती स्वेच्छेने या घाणीत आली नव्हती. तिच्या नवऱ्याने तिला फसवून धंद्याला लावलं होतं आणि तिच्या कामाईवर तो ऐश करत होता. कालीघाटच्या बदनाम गल्लीत तिच्यासारखीच कथा असणाऱ्या सगळ्या बायकापोरी असल्याने तिचं दुःख काही वेगळं नव्हतंच. त्यामुळे तिला सहानुभूती लाभून तिचं दुःख दूर होणं अशक्य बाब होती. किंबहुना ज्या कालीघाटपाशी विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रचाराचा नारळ फोडायला येतात. त्यांना देखील या वस्तीतल्या बायकांचं किड्यामुंग्याहून वाईट जीवन नजरेस पडत नव्हतं.

एरव्ही आपल्या धार्मिक भावनांचे गळू मोठ्या अहंगडांने जोपासणाऱ्या कुण्या धर्मप्रेमीस देखील साक्षात देवीच्या नावाने असणाऱ्या त्या वस्तीत जिवंत देवतेची राजरोस विटंबना होत असताना काहीच वाटत नव्हतं. बाकी सामान्यांच्या बद्दल तक्रारीचा मुद्दाच उरत नाही. टुम्पाने धंदा करू नये, वेगळा मार्ग स्वीकारावा असं तिच्या आईला वाटे. त्यासाठी ती मायमाऊली आपल्या पोरीची ढाल झाली होती.

त्याच भागात एनजीओ चालवणाऱ्या प्रोमिता बनर्जीशी एकदा त्यांची भेट झाली. प्रोमिताला ती माऊली म्हणाली

"आम्हाला कुणी बाहेरचा मसीहा वाचवू शकणार नाही, आमच्यातीलच कुणाला तरी पुढं यावं लागणार आहे. जो आमच्यासाठी दीपस्तंभ ठरेल."



तिचे हे उद्गार प्रोमिताला प्रेरणा देऊन गेले. प्रोमिता बनर्जीनी टुम्पाला यासाठी प्रेरित केलं. त्यातून भरारी घेत टुम्पाने दिशा नावाची एनजीओ सुरु केली. रस्ता भटकलेल्या आईबहिणींच्या वस्तीत ती आता दिशादर्शकाचं काम करणार होती. सुरुवातीला तिला विरोध झाला, नंतर नंतर सर्वच बायकांनी तिच्यावर विश्वास टाकला.

आजचा रंग हिरवा...

त्या रेड लाईट एरियातील लहान मुलामुलींचा ती आधार झाली. यासाठी तिने धंद्यातून बार झालेल्या खुडूक बायकांची मदत घेतली. त्या देखील मनापासून तिच्या कार्यात सामील झाल्या. कालीघाट रेड लाईट एरियाचे पाच भाग केले गेले. प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यासाठी एका वयस्कर वेश्येची नियुक्ती करण्यात आली. पाचही भागातील मुलांची यादी बनवून त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीवा याबद्दल त्यांना नेमकी माहिती दिली जाऊ लागली. यातूनच बदल घडत गेला. टुम्पाचं लक्ष आता खिदीरपूर रेड लाईट एरियावर आहे, हा बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. इथल्या मुलींसाठी टुम्पा आता रोल मॉडेल झाली आहे.


टुम्पा भेटली आणि काली घाटमधल्या देवीचा कालीमातेचा माझा शोध संपला. तिला दशभुजा नाहीत की हाती कुठली आयुधंही नाहीत. मात्र, तिने शेकडो मुलींच्या हाती वही पेन दिलंय जे त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणेल !

सलाम !!

- समीर गायकवाड

Tags:    

Similar News