भाजप आमदाराची अजब मागणी, ‘विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा’

Update: 2020-05-28 06:10 GMT

गाझियाबादचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishor Gurjar) यांनी क्रिकेटर विरोट कोहली कडे ही अजब मागणी केलीय. विराट कोहली (Virat Kohli) देशभक्त आहेत. त्यांनी देशाचे नाव मोठं केलंय त्यामुळे विराट कोहलींनी अनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा अशी मागणी या भाजप आमदाराने केलीय. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) निर्मित ‘पाताल लोक’ ही वेबसीरीज सध्या फारच चर्चेत आहे. ही वेबमालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. पण, सतत ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकते आहे.

पाताल लोक (Patal Lok) मालिकेत नंदकिशोर गुर्जर यांचा एक फोटो गुन्हेगारासोबत वापरला असून तो मला न विचारता वापरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कृत्यातून तिने गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

वेबमालिकेतून CBI ही संस्था खोटे आतंकवादी पेरत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यामुळे देशाची बदनामी होते आणि अनुष्का शर्मा पाकिस्तानचं आणि ISI संघटनेचं समर्थन करत असल्याची टीका नंदकिशोर यांनी केलीय. अनुष्का विरोधात राष्ट्रदोहाच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाईची मागणी केलीय.

या वादावर ‘न्युजरुम पोस्ट’ने नंदकिशोर य़ांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी, ‘देशापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठे केले आहे. तो देशभक्त आहे. त्याने अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा. अनुष्का विराटसोबत राहत आहे. तिने राष्ट्रदोहाचे काम केले आहे’ असा सल्ला विराटला दिला आहे.